• Sat. Sep 21st, 2024
बारामतीचं लोण रावेरमध्येही, मोदींच्या फोटोवरुन तू तू मै मै, नणंद-भावजयीत सोशल मीडिया वॉर

जळगाव: रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद व भावजयमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू असल्याचे दिसून येत आहे. खतांच्या बॅगवरती नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याने त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. तर याला उत्तर देत रक्षा खडसे म्हणाल्या की, जनतेच्या मनातून मोदी कसे काय पुसून टाकणार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले खतांची बॅग वाटप करत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत म्हटले की, खतांच्या बॅगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या बॅग दिल्या जात आहे. तर आता निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असे म्हटले आहे.

तर, रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसे यांनी शेअर केलेला पोस्टला उत्तर देताना म्हटले आहे की, तुम्ही नरेंद्र मोदी भिंतीवरून पुसू शकाल, मोदींचा फोटो खतांच्या बॅगवरून काढून टाकाल. मात्र, जनतेच्या मनात असलेले मोदी कोणी पुसू शकणार नाही. त्यामुळे नणंद-भावजय यांचे सोशल मीडिया वॉर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे या भाजपाकडून तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या आहे. गेल्या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि नणंद रोहिणी खडसे खेलकर या रक्षा खडसे यांच्यासोबत होत्या. मात्र, या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटात असल्याने रक्षा खडसे या एकाकी पडल्या आहेत.

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले की, खतांच्या बॅगवर पंतप्रधानाचे छायाचित्र, निवडणूक आयोग आता काय करणार? यामुळे विक्रेते अडचणीत आल्याने निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. तसेच, भाजपाने हरघर मोदी आणि भाजपाचे चिन्ह असलेले कमळ भिंतीवर रंगवलेले आहे. त्यावर देखील निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी सोशल मीडियाद्वारे केली आहे.

रक्षा खडसे यांनी सोशल मीडियाद्वारे खडसे यांना उत्तर दिले. मोदींचे नाव भिंतीवरून पुसून टाकाल, मोदींचे नाव खतांच्या बॅगवरून काढू शकाल. मोदींचे नाव विरोध म्हणून करू शकाल. पण, मोदींचे नाव जनतेच्या मनातून कसे पुसता येणार, अशा आशयाची पोस्ट रक्षा खडसे यांनी सोशल मीडियावर करत रोहिणी खडसे यांना उत्तर दिले आहे. यामुळे नणंद-भावजय यांचे सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed