• Sat. Sep 21st, 2024
नाशिकच्या रिंगणात महंतांचा मेळा, सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराजांची लोकसभा निवडणुकीत उडी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील बेझे चाकोरे येथील श्रीराम शक्तिपीठ आश्रमाचे सचिव तथा महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराजांचे शिष्य महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. महायुतीचा येथील जागेचा तिढा सुटलेला नसतानाच आता नाशिकच्या निवडणूक रणात आणखी एका महंतांनी उडी घेतल्याने रंगत वाढली आहे.

त्र्यंबकेश्वरमधील सर्व साधू आखाड्यांचे ठाणापती महंत यांनी शुभेच्छा देत समर्थन दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी आपणास कोणत्याही पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचा मनोदय व्यक्त केला आहे. उच्चशिक्षित असलेल्या सिद्धेश्वरानंद यांनी राजकरणाच्या शुद्धीकरणासाठी आपण लढणार आहोत, असे स्पष्ट केले आहे. त्यांना समर्थन दर्शविणाऱ्या साधूंनी आगामी सिंहस्थात सरकारमध्ये आपले अधिकृत प्रतिनिधित्व असावे म्हणून साधू खासदार करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

नाशिकच्या जागेचे गुऱ्हाळ! ठाकरे गटातर्फे वाजे, करंजकर की ठाकरे? महायुतीपाठोपाठ मविआतही उमेदवाराचा गोंधळ
निवडणुकीचा बिगुल वाजला नव्हता तेव्हापासून नाशिकच्या जागेसाठी साधू-महंतांनी दावा करण्यास प्रारंभ केला आहे. महंत कंठानंद महाराज आणि महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी यापूर्वीच नाशिकच्या जागेवर लढण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे सर्वांनी भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. एकूणच नाशिकची निवडणूक यंदा रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed