लातूर : लातूर शहरात एक संतापजनक अन् धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लातूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या अभय भुतडा या इसमाने राहत्या घरात आपल्या ६ वर्षाच्या मुलीला फाशी देऊन नंतर आपण घरातील सिलिंग फॅनला फाशी घेत आयुष्य संपवलं आहे. गेटनंबर चारजवळ मोतीनगरमधील ‘रामकाशी’ या इमारतीतील दुसर्या माळ्यावर भाड्याने राहत असलेल्या अभय लखन भूतडा (वय ३६) या हॉटेल व्यावसायिकाने हे कृत्य केलं आहे.आज सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घरातील सिलिंग फॅनच्या डाव्या बाजूला असलेल्या स्लॅबच्या लोखंडी हुकला आपली पाच वर्षीय चिमुकली मुलगी नव्या अभय भूतडा हिला गळफास दिला. त्यानंतर अभय भूतडा याने लागेच फॅनच्या उजव्या बाजूला असलेल्या स्लॅबच्या लोखंडी हुकला स्वतः गळफास घेतला. यामध्ये बाप-लेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनं लातूर शहरात एकच खळबळ उडाली असून ह्रदय पिळवटून टाकणार्या या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेला नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले होते. गांधी चौक पोलीस पुढील तपास करत आहेत.