• Sat. Sep 21st, 2024
राजू शेट्टी यांना धक्का, रविकांत तुपकर यांची लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा

बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. राजू शेट्टी हे फक्त स्वत:चाच विचार करतात आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात असा आरोप करत रविकांत तुपकर यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली.

रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असले तरी २०१९ पासून ते स्वतंत्रपणे काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तुपकर हे लोकसभा निवडणुकीची तयारी करत असून ते महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते पण कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या जोरदार टीका केली. राजू शेट्टी हे स्वार्थी राजकारणी असून ते फक्त स्वत:चा विचार करतात, वाटाघाटी करतात आणि आपल्या भागातील (पश्चिम महाराष्ट्र) एक-दोन जागा घेतात आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडतात. शेट्टी हे माझे राजकीय गुरू कधीच नव्हते, शरद जोशी हेच माझे राजकीय गुरू होते. त्यांनाच मी माझा राजकिय गुरू मानतो, असेही तुपकर म्हणाले.

कोण आहेत रविकांत तुपकर?

रविकांत तुपकरांचा जन्म बुलढाणा तालुक्यातील सावळा या गावचा. कॉलेज वयातच शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या भाषणांकडे आकर्षित होऊन जोशी यांच्या संघटनेत काम करायला सुरूवात केली. काही काळाने त्यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. राजू शेट्टी यांनी तुपकरांना पक्षाच्या प्रदेशाध्यपदी काम करण्याची संधी दिली.

२०१५ साली देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात वस्त्रउद्योग महामंडाळाचे तुपकर अध्यक्ष झाले. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याचे आरोप करून त्यांनी महामंडाळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजू शेट्टी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर काही काळ ते संघटनेपासून दूर झाले होते पण कालांतराने ते पुन्हा पक्षात आले. रविकांत तुपकर यांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने व उपोषणे केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed