भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई या सुरक्षित मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोयल यांच्याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार सापडलेला नाही. घोसाळकर यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही, परंतु पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते प्रबळ दावेदार मानले जातात.
“भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ मुंबईतील सर्वात अवघड सीट समजली जाते. परंतु विनोद घोसाळकर हे जुने-जाणते नेते आहेत. काही भागात त्यांच्या कुटुंबाला मानणारे मतदार आहेत. त्यांना उमेदवार म्हणून घोषित केल्यास ठाकरे गट किमान दहिसर आणि बोरिवलीमध्ये चांगली कामगिरी करेल आणि त्यानंतर उर्वरित विधानसभा मतदारसंघात काम करता येईल” असे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.
घोसाळकरांना ही जबाबदारी स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे, परंतु अंतिम निर्णय होणे बाकी आहे. अवघड असले तरी विजय अशक्य नाही. २००९ मध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला होता. या लोकसभा मोहिमेमुळे आम्हाला या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिलेदारांमध्ये चैतन्य निर्माण करण्यात मदत होईल, असे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने सांगितले.
विनोद घोसाळकर यांनी २००९ ते २०१४ या कालावधीत मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचं नेतृत्व केलं होतं. त्याआधी ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. त्यांचे दिवंगत सुपुत्र अभिषेक घोसाळकर आणि सून तेजस्वी घोसाळकर हे दोघेही माजी नगरसेवक आहेत. गेल्याच महिन्यात फेसबुक लाईव्ह करुन मॉरीस नरोन्हा याने घोसाळकरांची गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर आरोपीनेही आत्महत्या केली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात दहिसर, मागाठाणे, बोरिवली, कांदिवली पूर्व, मालाड पश्चिम आणि चारकोप विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. २०१९ मध्ये भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता. त्यावेळी शेट्टी यांनी चार लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत विजय संपादन केला होता. त्यामुळे ही राज्यातील भाजपची सर्वात सुरक्षित जागा ठरली. त्याआधी २०१४ मध्ये शेट्टी यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी खासदार संजय निरुपम यांचा पराभव केला होता.
पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गट उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागा काँग्रेसला देण्यास तयार आहेत. मात्र, काँग्रेस उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन जागा लढवण्यासाठी उत्सुक आहे.