• Mon. Nov 25th, 2024
    भाजपच्या गडावर ‘राष्ट्रवादी’चा डोळा, कोणाला मिळणार उमेदवारी?

    योगेश बडे, गडचिरोली: छत्तीसगड आणि तेलंगण राज्यांच्या सीमेलगत माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ पसरलेला आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या या जागेवर यंदा एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) दावा केला आहे. राज्यात भाजप आपल्या हक्काच्या मतदारसंघांवर ठाम असताना महायुतीमध्ये ‘राष्ट्रवादी’ने विदर्भातील हा मतदारसंघ मागितला आहे.

    गडचिरोली येथे दोन वर्षांपूर्वीच्या एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या जागेवर दावा सांगितला होता. काँग्रेसचा सलग दोन वेळा पराभव झाल्याने ही जागा आघाडीत ‘राष्ट्रवादी’ला मिळावी म्हणून पवार आग्रही होते. धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवार म्हणून तयारीला लागण्याची सूचनाही त्यांनी केली होती. दरम्यान, ‘राष्ट्रवादी’च्या फुटीनंतर महायुतीत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता अन्न आणि औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने ही जागा ‘राष्ट्रवादी’ला दिली, तरी भाजपच्या सहकार्याने जिल्ह्यातील राजकारण करणाऱ्या ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवाराची भिस्त ही भाजपवरच राहील. दुसरीकडे, दोनदा पराभव झालेल्या या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे.

    विधानसभानिहाय चित्र

    अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, अहेरी, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. गडचिरोली, आरमोरी, चिमूर येथे भाजपचे आमदार आहेत. ब्रह्मपुरी आणि आमगाव येथे काँग्रेसचे, तर अहेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आहेत.

    मागील तीन निवडणुकांचे निकाल

    लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेत २००९मध्ये गडचिरोली-चिमूर हा नवा मतदारसंघ तयार झाला. सन २००९च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे मारोतराव कोवासे विजयी झाले होते. भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचा २८,५०८ मतांनी पराभव झाला. या निवडणुकीत बसपचे राजे सत्यवानराव आत्राम यांनी १ लाख ३५ हजारांहून अधिक मते घेतली होती. सन २०१४च्या निवडणुकीमध्ये नेते यांनी मोदी लाटेत पराभवाचा वचपा काढला. दोन लाखांहून अधिक मते घेऊन काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांना पराभूत केले. तेव्हा बहुजन समाज पक्षाचे उमेदवार रामराव नन्नावरे यांनी ६६ हजारांहून अधिक मते घेतली होती. सन २०१९च्या निवडणुकीतही भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी अशीच लढत झाली. अशोक नेते यांनी ७७ हजाराहूंन अधिक मताधिक्क्याने काँग्रेसचा पराभव केला. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश गजबे यांनी एक लाखांहून अधिक मते घेतली होती.

    यंदा रिंगणात कोण?

    गडचिरोली मतदारसंघ महायुतीत भाजपकडे आहे. विद्यमान खासदार अशोक नेते विजयाची हॅट्‌ट्रिक साधण्याकरिता उत्सुक आहेत. नेते यांना पक्षांतर्गत विरोध होण्याचाही धोका आहे. भाजप नवा चेहरा देऊ शकते. गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी हेही भाजकडून दावेदार आहेत. महायुतीत ही जागा भाजप मित्रपक्षासाठी सोडणार नाही अशी चर्चा आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्यास राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे उमेदवार असतील. काँग्रेसमधून डॉ. नामदेव उसेंडी आणि डॉ. नामदेव किरसान हे लढण्यास उत्सुक आहेत. या मतदारसंघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ असल्याने त्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे.

    प्रचारातील प्रमुख मुद्दे

    गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक मुद्दे कितपत प्रभावी ठरतील, याबाबत साशंकता आहे. माओवाद्यांची काही भागांत असलेली दहशत, लोहखनिज खाणीला असेलला आदिवासींचा विरोध, बेरोजगारीचा प्रश्न, आरोग्यसेवेच्या समस्या, दळणवळणाच्या सुविधेचा अभाव हे जुनेच मुद्दे पुन्हा चर्चेत येतील. ओबीसी आरक्षण तसेच अलीकडेच मोहफुलापासून दारूनिर्मिती करणाऱ्या कारखान्याला सरकारने दिलेली परवानगी हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. मेडीगड्डा प्रकल्पामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचा विषय महत्त्वाचा ठरेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *