• Sat. Sep 21st, 2024

नाशिकच्या जागेचे गुऱ्हाळ! ठाकरे गटातर्फे वाजे, करंजकर की ठाकरे? महायुतीपाठोपाठ मविआतही उमेदवाराचा गोंधळ

नाशिकच्या जागेचे गुऱ्हाळ! ठाकरे गटातर्फे वाजे, करंजकर की ठाकरे? महायुतीपाठोपाठ मविआतही उमेदवाराचा गोंधळ

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच असताना महाविकास आघाडीत मात्र कोण उमेदवारी करणार यावरून पेच वाढला आहे. नाशिकची जागा मविआत ठाकरे गटाकडे असली तरी संभाव्य उमेदवारांची नावे रोज बदलत असल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर उमेदवारी गृहीत धरून मतदारांच्या गाठीभेटी घेत असतानाच, आता सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव पुढे आले आहे, तर दुसरीकडे मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरेंच्याही नावाची चर्चा सुरू झाल्याने महाविकास आघाडीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून, नाशिक लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या नावांची घोषणा राजकीय पक्षांकडून सुरू असताना, नाशिकच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतही गोंधळाचे वातावरण आहे. महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नाशिकला हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात नाराजीनाट्य रंगले आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत नाशिकची जागा शिवसेना ठाकरे गट लढणार, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा उमेदवार कोण, यावरून मविआत विचारमंथन सुरूच आहे. ठाकरे गटाकडून करंजकर यांना आधीपासूनच चाल देण्यात आली आहे. त्यामुळे करंजकर यांनी गावोगावी प्रचार करीत असताना, राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांच्या नावावर आक्षेप घेत उमेदवार बदलाची मागणी केली आहे. त्यामुळे ठाकरे गटात चलबिचल सुरू झाली असून, आता राजाभाऊ वाजे यांचे नाव पुढे आले आहे. त्यासाठी ठाकरे गटाच्या बैठकींचा जोर वाढला असून, करंजकरांचे काय करायचे, असा पेच उभा ठाकला आहे. वाजे उमेदवार असल्यास त्यांना शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मदत मिळेल, अशी चर्चा ठाकरे गटात आहे. त्यामुळे करंजकरांचे नाव मागे पडत आता वाजेंच्या नावाने आघाडी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

नितीन ठाकरेंचाही विचार

वाजे की करंजकर, यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच आता मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यासाठीची तयारीही एक वर्ष आधीपासूनच सुरू केली आहे. मात्र, त्यांचे प्राधान्य भाजपला होते. आता भाजपला उमेदवारी मिळण्याची आशा धूसर झाल्याने ठाकरेंनी मविआकडे मोर्चा वळवला आहे. अॅड. ठाकरेंच्या नावाचाही विचार सुरू असला तरी शरद पवार त्यांच्या नावाबाबत काय भूमिका घेतात, यावरच त्यांची उमेदवारी अवलंबून असेल.
१०% गावात तरी तुमचे सरपंच आहेत का? कदमांचा ठाकरेसेनेला सवाल; सांगलीवरुन चांगलीच जुंपली
भाजपनेही वाढवला दबाव

महाविकास आघाडीत उमेदवारीचा पेच असताना, महायुतीत मात्र जागा अदलाबदलीचा घोळ सुरू आहे. त्यासाठी भाजपने दबाव आणखी वाढवला आहे. खासदार श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्या नावाला अजित पवार गटासह भाजपचाही विरोध आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी तर ही जागा अजित पवार गटाला सोडण्याची मागणी केली आहे, तर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाला जागा सोडल्यास उमेदवार पराभूत होईल, असा इशाराच पक्षाला दिला आहे. नाशिकची जागा भाजपला मिळावी, यासाठी मंग‌ळवारी पुन्हा पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतल्याने महायुतीतही पेच निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed