• Mon. Nov 25th, 2024

    आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे

    ByMH LIVE NEWS

    Mar 18, 2024
    आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे

    रायगड जिमाका दि.17- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना नुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी  करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले.

    आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उप जिल्हाधिकारी संदेश शिर्के, उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले,रायगड मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात कालपासून लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.   सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय- निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले भित्तीपत्रक, झेंडे, कटआऊट्स, संदेश काढून त्याचा अहवाल २४ तासात सादर करावा. भिंतीवरील रंगविलेल्या जाहिरातीदेखील काढण्यात याव्यात.
    शासकीय मैदाने, रस्ते, उद्याने, विद्युत खांब, खाजगी मालमत्तेवर परवानगी न घेता लावलेले भित्तीपत्रक किंवा संदेशही ४८ तासात काढण्यात यावेत. परवानगी न घेता खाजगी मालमत्तेवर जाहिरात केली असल्यास गुन्हे दाखल करण्यात यावेत. सर्वांनी काटेकोरपणे निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी. ‘सी- व्हिजील’ अॅपवर आलेल्या तक्रारींसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
    मतदान केंद्रांवरील सुविधा विशेषत: पाणी, वीज, स्वच्छता गृहे, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प याचेही आतापासून नियोजन करा. सर्व संबंधित यंत्रणानी मतदान केंद्राना भेटी देऊन पाहणी करावी. तसेच आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा तयार करून घ्याव्यात. तसेच भरारी पथक सक्रीय ठेवा.आचारसंहिता काळात नवीन विकास कामाना परवानगी देता येणार नाही. तसेच नवीन कामाना सुरुवात करता येणार नाही. सध्यस्थितीत सुरु असलेली कामे नियमित पणे सुरु ठेवायची आहेत असेही श्री जावळे यांनी स्पष्ट केले.
    मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येकांनी ‘स्वीप’चे आतापासूनच नियोजन करावे. त्यादृष्टीने काही वेगळे अनोखे उपक्रम राबवावेत. सर्व समाज घटकांचा यामध्ये सहभाग घ्यावा. त्यांच्यामध्ये जनजागृती करावी असेही निर्देश श्री जावळे यांनी यावेळी दिले.
    निश्चित केलेली सभा ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना सभा घेण्याची समान संधी देण्याबाबत संबंधित यंत्रणेमार्फत कार्यवाही करण्यात यावी. शासकीय विश्राम गृह यांचा वापर राजकीय कारणासाठी अथवा प्रचार, सभा, मेळावे यासाठी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
    शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. कुणीही राजकीय प्रचारात सहभागी होऊ नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. निवडणूक ही सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी आपल्या कर्तव्याचे आणि जबाबदारीचे पालन करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच सर्व नोडल अधिकारी आणि विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.

    निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

    लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे टोल फ्री संपर्क क्रमांक  उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री किशन जावळे यांनी दिली.भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली आहे. नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास त्यांनी १८००२३३०१०२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

    या कक्षाद्वारे तातडीने तक्रारीची दखल घेण्यात येईल. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला आलेल्या तक्रारीनुसार भरारी पथके आवश्यक कारवाई करतील, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री जावळे यांनी स्पष्ट केले आहे.
    निवडणूक आयोगामार्फत cVIGIL ॲपचीही सुविधा  उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला जर निवडणुकीत काही अफरातफर दिसून आली तर या ॲपवर जाऊन त्याची माहिती द्यायची आहे. फोटो अपलोड करण्याचीही सुविधा आहे. ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली. त्याच्या लोकेशनवरून निवडणूक आयोगा सदर परिसराचा माग काढेल आणि १०० मिनिटांच्या आत आयोगाचे पथक त्याठिकाणी दाखल होईल.आवश्यक ती कार्यवाही करेल अशी माहिती श्री जावळे यांनी दिली आहे.

    निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आयटी ॲप्लिकेशन्स

    यंदाच्या निवडणुकीमध्ये विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने भारत निवडणूक आयोगाने आयटी ॲप्लिकेशन्स(IT Applications) विकसित केले आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री किशन जावळे यांनी केले आहे.

    सी व्हीजिल (cVigil)
    आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणा-या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigilहे मोबाईल ॲप विकसित केले आहे. यामध्ये दक्ष नागरिकाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे सदर ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

    सक्षम ॲप
    पात्र दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे इ. सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे आयटी ॲप्लिकेशन्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

    केवायसी Know Your Candidate App
    मतदारांना त्यांच्या उमेदवाराबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेले गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती, इ. माहिती पाहता येऊ शकते.

    ईएसएमएस ॲप (ESMS App)
    निवडणूक अधिक मुक्त व निष्पक्ष वातावरणामध्ये व्हावी यासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसा, दारु, अंमली पदार्थ व भेटवस्तू, मौल्यवान धातू, इ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहे. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दरदिवशी ESMS App/ Portal वरुन कळविण्यात येत आहे.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed