भाजपकडून उमेदवारी नाकारल्याने मोहिते पाटील नाराज
माढा लोकसभेची उमेदवारी भाजपकडून नाकारण्यात आल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे ते भाजपपासून दूर जाऊ शकतात असा अंदाज वर्तला जात आहे. धैर्यशील मोहिते पाटील माढ्याच्या मैदानात तुतारी चिन्ह घेऊन उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.रविवारी दिवसभर अकलूजमधील शिवरत्न बंगल्याच्या बैठकीत काय निर्णय झाला, याचा तपशील मिळाला नसला तरी येत्या दहा दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता खुद्द शेकापचे जयंत पाटील यांनी वर्तविली आहे. त्यामुळे ‘डॅमोज कंट्रोल’साठी गिरीश महाजन हे मोहिते पाटील यांना भेटायला अकलूजमध्ये आले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगावा घेऊन मोहिते पाटील यांच्या भेटीला अकलूजमध्ये आले आहेत अशीही चर्चा आहे.
शिवरत्न बंगल्यात झालेल्या बैठकीत हे नेते उपस्थित होते
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार नारायण पाटील, सांगोल्याचे शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख हे उपस्थित होते.