• Sat. Sep 21st, 2024

नाथाभाऊंनी सूनबाईंना विचारलं, राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीट हवंय का? रक्षा खडसे म्हणाल्या….

नाथाभाऊंनी सूनबाईंना विचारलं, राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीट हवंय का? रक्षा खडसे म्हणाल्या….

निलेश पाटील, जळगाव : भाजपतून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी माझं राजकीय पुनर्वसन केलं. त्यांना सोडून मी कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट करताना भाजपप्रवेशाच्या चर्चांमधली हवा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काढून घेतली. जरी भविष्यात माझा भाजपमध्ये जाण्याचा विचार झाला तरी मी स्थानिक नेतृत्वाशी चर्चा न करता भाजपमधील वरिष्ठांशी चर्चा करेन कारण त्यांचे आणि माझे मधुर संबंध आहेत, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना लगावला. त्याचवेळी रावेर लोकसभा आणि सूनबाई रक्षा खडसे यांच्या उमेदवारीविषयी देखील खडसेंनी भूमिका स्पष्ट केली.

राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप रखडलेलं आहे. असे असताना मतदारसंघावर दावे प्रतिदावे सांगण्यास कधीचीच सुरूवात झाली आहे. जळगाव आणि रावेर कोण लढवणार? महाविकास आघाडीत या जागा कोणाच्या वाट्याला जाणार, अशा मुद्द्यांवर आयोजित पत्रकार परिषदेत शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीट हवंय का? खडसेंनी सूनबाईंना विचारलं

रावेर मतदारसंघात शरदचंद्र पवार गट उमेदवार देणार आहे. या जागेसाठी रक्षा खडसे यांना मी स्वत: राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेणार का? असा प्रश्न विचारला. मात्र यावर खासदार रक्षा खडसे यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. मी मरेपर्यंत भारतीय जनता पक्षातच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे खासदार रक्षा खडसे या राष्ट्रवादीकडून उमेदवार असू शकत नाही, असे खडसे यांनी सांगितले.
रावेरसाठी शरद पवारांची विशेष रणनीती, एकनाथ खडसेंच्या समर्थकाला उमेदवारी देणार? भाजपमध्ये अजूनही पेच कायम

माझीही रावेर लोकसभा लढण्याची इच्छा

रावेरची जागा ही शरदचंद्र पवार गटाला सोडण्यात आली असल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी रावेर लोकसभा पूर्ण ताकदनिशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट लढवणार आहे. इच्छुक उमेदवारांची यादी वरिष्ठ पातळीवर पोहोचलेली आहे. चार ते पाच उमेदवार इच्छुक आहेत. मी स्वत:ही रावेरमधून एक दावेदार असून अंतिम निर्णय पक्ष घेईल, असे खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे बॅकफूटवर, रक्षा खडसेंचाही पत्ता कट होणार? रावेरमध्ये भाजप, पवारांकडून नव्या उमेदवाराचा शोध

तिकीट नाही दिलं तरी पक्षाच्या उमेदवाराचं काम करेन

आधीच माझे हृदयाचे ऑपरेशन झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि शरद पवार साहेबांची चर्चा करूनच निवडणूक लढविण्यासंदर्भात मी निर्णय घेईन.माझी तब्येत चांगली नसली तरी पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करावा, अशी इच्छाही एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे. एकदा तरी खासदार व्हावे अशी माझी इच्छा आहे. परंतु जरी पक्षाने मला उमेदवारी दिली नाही तरी पक्ष जो उमेदवार देईल त्याला विजयी करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल, अशी ग्वाही खडसेंनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed