म. टा. प्रतिनिधी, नाशिक: पेट्रोल पंप आणि त्यासाठीचा परवाना मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या एका व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी गंडावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका ऑइल कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून संशयितांनी व्यावसायिकाची ४६ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील ४७ वर्षीय किराणा व्यावसायिकाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांना पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी परवाना हवा होता. त्यासाठी त्यांनी सन २०२३ मध्ये ऑइल कंपन्यांच्या वेबसाइटवर अर्ज केला. तेव्हा दोन अर्ज नाकारण्यात आले. त्यानंतर १ जानेवारी रोजी तिसऱ्यावेळी त्यांनी पुन्हा अर्ज केला. तेव्हा अनोळखी व्यक्तिने फिर्यादींना व्हॉटसॲप व ई-मेलवरून संपर्क साधला. ‘आम्ही संबंधित कंपनीत विपणन अधिकारी व प्रतिनिधी आहोत. तुमचा परवान्यासाठीचा अर्ज मिळाला’, असे ते म्हणाले. त्यानुसार फिर्यादींची कागदपत्रे मागवून घेत परवाना शुल्क व प्रोसेसिंग फी भरण्यास सांगितली. परवाना मिळणार असल्याने फिर्यादी यांनी टप्प्याटप्प्याने संशयितांच्या बँक खात्यावर ४६ लाख रुपये जमा केले. मात्र, बरेच दिवस उलटल्यावरही परवाना न मिळाल्याने फिर्यादी संबंधित ऑइल कंपनीच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.