• Sat. Sep 21st, 2024

‘त्यांच्या सर्व चांगल्या, वाईट कुंडल्या माझ्याकडे आहेत’; नाना पटोले कोणाला म्हणाले?

‘त्यांच्या सर्व चांगल्या, वाईट कुंडल्या माझ्याकडे आहेत’; नाना पटोले कोणाला म्हणाले?

म. टा. वृत्तसेवा, गोंदिया

‘प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काय कुंडल्या आहेत हे माहिती नाही. पण, त्यांच्या सर्व चांगल्या, वाईट कुंडल्या माझ्याकडे आहेत. त्यांनी फक्त सुरुवात करावी, मग कोणत्या कुंडल्या बाहेर काढायच्या हे मी ठरवणार’, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. गुरुवारी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील काँग्रेससह सर्व पक्षाच्या आमदार, खासदारांच्या कुंडल्या माझ्याजवळ आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सडक-अर्जुनीच्या सभेत केला होता.

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्रीनिमित्त आले असता पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, खासदार पटेल यांनी भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी पुन्हा आपली इच्छा असल्याचे बोलून दाखविले आहे. पक्षाकडून संधी मिळाल्यास लोकसभा नक्की लढणार असे सांगत आपल्या मनातील सुप्त इच्छा त्यांनी बोलून दाखविली.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष असल्याने महायुतीचा उमेदवार नक्कीच निवडून येणार असा दावाही त्यांनी केला. मग पटेल हे राज्यसभेवर कशाला निवडून गेले. त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरायला हवे होते. या दोन्ही जिल्ह्यांत भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद उरलेली नाही. या निवडणुकीत काँग्रेसची खरी ताकद दिसून येईल. हे माहिती असल्यानेच पटेल हे राज्यसभेवर गेल्याचा टोलाही पटोले यांनी लगावला.

भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडेच आहे. उद्या पक्षाने आदेश दिला तर त्याचे मी पालन करणार आहे. ही जागा लढवून विजयही मिळविणार, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed