• Sat. Sep 21st, 2024
राणा दाम्पत्याची संवादासाठी तळमळ, नेत्यांची हाताची घडी अन् तोंडावर बोट, कारण काय?

अमरावती: राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, अनेक पक्षांचे जागावाटप सुद्धा अंतिम टप्प्यात आले. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी नवनीत राणाची पर्यायी उमेदवार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीदरम्यान पक्षश्रेष्ठींप्रमाणेच स्थानिक नेत्यांसोबत चांगला संवाद निर्माण व्हावा यासाठी राणा दाम्पत्त्याची तळमळ सुरू असून जिल्ह्यातील नेत्यांनी मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवत वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थन घेऊन लोकसभेवर निवडून गेल्यात. दरम्यान, काही दिवसातच त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत संधान साधत झेंडा आणि अजेंडा दोन्हीही बदलले.

भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांसोबत सुसंवाद असताना राणा दाम्पत्याने जिल्ह्यात आपले उपद्रव मूल्य कायम ठेवण्यासाठी अनेक नेत्यांसोबत पाच वर्षात खुला पंगा घेतला. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू, आमदार प्रवीण पोटे, आमदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, तुषार भारतीय आदि नेत्यांसोबत विविध कारणावरून राणा दाम्पत्यांनी खुला विरोध घेतला होता.

सत्तांतरणाच्या काळात बच्चू कडू यांनी ५० कोटी घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. यावर त्यांचा वाद विकोपाला जाऊन बच्चू कडू यांनी कोथळा बाहेर काढण्याचे विधान केले होते. तर राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केली होती. अखेर यावर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला.

यशोमती ठाकूर यांनी कडक नोटा घेऊन लोकसभेत काम न केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. दरम्यान, पाच वर्षात राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यामध्ये विविध विधानांवरून खटके उडत राहिल्याचे अमरावतीकारांनी बघितले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि तुषार भारतीय यांच्यासोबत सुद्धा विविध कारणांवरून विरोधाची भूमिका आणि सतत वाद जनतेसमोर आले. मध्यंतरीच्या काळात रवी राणा आणि आमदार प्रवीण पोटे यांच्यामध्ये सुद्धा झालेला वाद पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. आमदार सुलभा खोडके आणि आमदार रवी राणा यांच्यामधील मतदारसंघातील वाद आणि बळवंत वानखडे विरोधात केलेले आक्षपार्ह विधान यावरून निर्माण झालेला वाद राज्यभरातील जनतेने बघितला.

हनुमान चालीसा प्रकरणावर राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरेंविरोधात उठवलेले रान आणि त्यानंतर राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाच्या ट्रॅकवर आणलेले आपले राजकारण, यामुळे पारंपरिक पद्धतीने हिंदुत्वासाठी लढणारे अनेक नेते मुख्य प्रवाहातून बाजूला झाले आणि राणा यांनी आपल्यासमोर हिंदू शेरनी हे बिरूद लावत समाजात हिंदुत्ववादी अशी प्रतिमा निर्माण केली.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे वैचारिक लवचिकतेचे राजकारण महाराष्ट्राने अनुभवले. राणा दाम्पत्याला जिल्ह्यात होणारा विरोध बघता शिवसेना शिंदे गट प्रहार जनशक्ती पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या उमेदवारी करिता इतर उमेदवारांना प्राधान्य द्यावे, असे समन्वयाच्या बैठकीत लिहून दिल्याचे विधान माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केले होते.

२०१४ च्या लोकसभेची तयारी करत असताना नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आतापर्यंत विसंवाद झालेल्या नेत्यांसोबत विविध मार्गाने संवाद साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. राणा यांची नेत्यांसोबत संवादासाठी सुरू असलेली तळमळ बघता भारतीय जनता पार्टी आणि इतर नेत्यांनी सध्या हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed