सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त केला. आज पुन्हा मजलिस येऊन बसले आहेत, ते योग्य आहे का, असा प्रश्न करीत, एमआयएम उखडून फेका आणि कमळ फुलवा, असे आवाहन शहा यांनी केले. ‘जे पक्ष घराणेशाहीने चालतात, ते देशाच्या लोकशाहीसाठी काम करू शकतात का? ‘इंडिया’तील सर्व पक्ष घमंडिया आहेत. परिवारवादी आघाडी आहे. सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे. उद्धव ठाकरे यांना मुलाला, तर शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री बनवायचे आहे. स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे, ते तुमचे भले कसे करणार’, असा टोला शहा यांनी लगावला. भारताला सुरक्षित, विकसित करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार करू शकते. तुमच्यासाठी नरेंद्र मोदी आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांना टोला
संभाजीनगर नामकरणाला विरोध करणारे, कलम ३७० हटवण्यास विरोध करणाऱ्यांसोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले आहेत. ते जनतेसमोर जाणार कसे, असा टोलाही शहा यांनी लगावला.
‘पवार, ठाकरेंनी राज्यासाठी काय केले?’
‘शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या विकासासाठी काय केले, यावर आमच्यासोबत चर्चा करावी. आम्ही १० वर्षांत काय केले ते आमचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली येऊन सांगेन’, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे केले. छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेमध्ये शहा बोलत होते.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्मीरमधील ३७० कलम हटवले, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारले गेले. सर्जिकल स्ट्राइक केले, देशातून दहशतवाद आणि माओवाद हद्दपार केला. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. मोदी म्हणजे देशवासीयांसाठी गॅरंटी आहे, पुढील पाच वर्षे त्यांना मिळाली तर ही अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येईल’, असा दावाही त्यांनी केला.
जगात मोदींच्या नावाचा डंका
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जगात भारताचा दबदबा वाढला आहे. भारताचा सन्मान वाढविण्यासाठी त्यांनी काम केले आहे. तब्बल १५ देशांनी पंतप्रधान मोदी यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. मोदी नावाचा डंका सध्या वाजत असून हा एक प्रकारे भारतवासीयांचा सन्मान आहे, असेही शहा म्हणाले.