• Sat. Sep 21st, 2024
सातारा, कोल्हापूर, सांगली आणि हातकणंगलेत महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले, पाहा यादी!

गुरुबाळ माळी, कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, हातकणंगलेत महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सांगलीत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विशाल पाटील अथवा चंद्रहार पाटील यांची नावे जवळजवळ निश्चित झाली आहेत. त्याची अधिकृत घोषणा आठ दिवसात होण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात मागील वेळी शिवसेनेने विजय मिळवल्याने ठाकरे गटाने त्यावर हक्क सांगितला. स्वाभिमानी संघटना महाविकास आघाडीसोबत येणार असल्याने हातकणंगलेची जागा त्यांच्यासाठी सेनेने सोडली. दुसरी कोल्हापूरची जागा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी सोडावी लागणार आहे. कारण हाताच्या चिन्हावर लढण्याची महाराजांची इच्छा आहे. सेनेने यामुळे ही जागा काँग्रेसला सोडण्याचे मान्य केले आहे.
कोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे? लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार?

दोन जागा मित्र पक्षासाठी सोडल्याने दक्षिण महाराष्ट्रात एक तरी जागा लढवावी यासाठी शिवसेनेने सांगलीची जागा मागितली. तेथे काँग्रेसच्या विशाल पाटील यांची सेनेच्या चिन्हावर लढण्याची मानसिकता नाही. पण जागा वाटपात सेनेला हा मतदार संघ सोडावा लागणार आहे. मागील वेळी ऐनवेळी त्यांच्या हातात स्वाभिमानी संघटनेची बॅट हातात देण्यात आली. पाटील तयार नसतील तर पैलवान चंद्रहार पाटील यांचा पर्याय सेनेने पुढे केला आहे. चंद्रहार यांना काहीही करून निवडणूक लढवायची आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढण्याची त्यांची तयारी आहे. त्यापेक्षा सेनेच्या तिकीटीवर लढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू करण्यात आली आहे.
रामटेकमध्ये काय होईल? जळगावमध्ये ठाकरेंचा वाघ रिंगणात, कोल्हापूर काँग्रेसकडे तर सांगली ठाकरेंकडे?

या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरातून श्रीमंत शाहू महाराज, हातकणंगलेतून शेट्टी आणि सांगलीतून विशाल अथवा चंद्रहार यांची नावे निश्चित झाली आहेत. शेट्टी हे आघाडीत येणार नसून त्यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. त्या बदल्यात इतरत्र त्यांची मदत घेण्यात येणार आहे.
कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांचे नाव आघाडीवर; संभाजीराजेंची इन्स्टाग्रामवर सूचकं स्टोरी, चर्चेला उधाण

सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार हे निश्चित आहे. तेथे खासदार श्रीनिवास पाटील लढणार की त्यांचे सुपुत्र सारंग एवढाच मुद्दा आहे. यामुळे महाविकास आघाडीची पश्चिम महाराष्ट्रातील जागा वाटप झाल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्याची केवळ अधिकृत घोषणा होणे एवढेच शिल्लक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed