मुंबई: राज्यात सध्या महायुतीचं भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असं तीन चाकांचं सरकार आहे. ए लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून लोकसभेच्या जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी ते महायुतीच्या नेत्यांसोबत उद्या बैठक करणार आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुन्हा भाजपशी युती करायची आहे, असं म्हणत केसरकरांनी खळबळ उडवून टाकली आहे.शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचंही केसरकरांनी सांगितलं आहे. केसरकरांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच गोंधळ माजला आहे. दीपक केसरकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना हा दावा केला आहे. पण, रश्मी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र प्रवासानंतर फडणवीस आणि ठाकरेंमधील मतभेद मिटले का असाही प्रश्न उपस्थित केला गेला. त्यानंतर आता केसरकरांच्या या दाव्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
दीपक केसरकर काय म्हणाले?
आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दिल्लीला गेले होते, त्यांनी मोदींची भेट घेतली असं वृत्तपत्रात छापून आलं होतं. त्याला त्यांनी नकारही दिला नाही. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी जो प्रश्न उपस्थित केला तो अत्यंत बरोबर होता की तुमची गॅरंटी आहे का?, त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी याची उत्तरं दिली पाहिजे. आतातरी शिवसैनिकांनी डोळे उघडले पाहिजे. त्यांनी समजून घेतलं पाहिजे की महायुती महाराष्ट्रात होणार होती. उद्धव ठाकरे तसं ठरवून आले होते. त्यांनी दोन वेळा दिलेला शब्द फिरवल्यानंतर, पंतप्रधानांना फसवल्यानंतर, पंतप्रधानांनी पुन्हा त्यांना जवळ घेण्याचा निर्णय घ्यावा की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण, आता वस्तुस्थिती सर्वांना कळाली आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.