• Mon. Nov 25th, 2024
    संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन दिले होतं का? फडणवीसांकडून जलील टार्गेट

    छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरच्या खासदाराने कलम ३७० चं समर्थन केलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थ दिलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने मोदींच्या कार्याला हात वर करून समर्थन दिलं होतं का? असे सवाल विचारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार इम्तियाज जलील यांना टार्गेट केलं. त्याचवेळी यंदाच्या निवडणुकीत गतवर्षीची चूक सुधारण्याची वेळ आल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

    आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज ( मंगळवारी) सायंकाळी साडेसात वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. शाह यांनी सभेतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले. लोकसभा क्लस्टर छत्रपती संभाजीनगर, जालना व नगर मतदारसंघांसाठी होणाऱ्या या सभेसाठी भाजपने जय्यत तयारी केली होती. या सभेला अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्र भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भागवत कराड, खासदार अजित गोपछडे आदी नेते उपस्थित होते.

    फडणवीस म्हणाले, “या नगरीला छत्रपती संभाजीनगर नाव द्यायला हवे असे पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. मात्र दुर्दैवाने सत्तेत असलेल्या अडीच वर्षात त्यांचे पुत्र नाव देऊ शकले नाही. सरकार जाताना त्यांना जाग आली. आमचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नगरीचे नाव छत्रपती संभाजीनगर केलं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामुळे छत्रपती संभाजीनगर नाव झालं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं”

    संभाजीनगरचे खासदाराने ३७० कलम हटविताना हात वर केला होता का? संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन दिलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने मोदींच्या कार्याला हात वर करून समर्थन दिलं होतं का? मात्र जे ३७० ला विरोध करत होते, ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. यावेळी संभाजीनगरच्या मतदारांनी चूक करू नये. छत्रपती संभाजी नगरचा खासदार हा मोदींच्या विचाराचा असला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *