युगेंद्र पवार आज बारामती दौऱ्यावर होते यावेळी एका गावात बोलत असताना ते म्हणाले की, जर येथे वेगळ्या प्रकारचे राजकारण होत असेल तर बारामतीकरांनी असे राजकारण बघितले नाही. तुम्ही पण असे धमकीचे दमदाटीचे राजकारण बघितले नसेल. जर तसे काही असेल तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधा. अजिबात आपण घाबरायचे नाही. आपण पवार साहेबांबरोबर बऱ्याच वर्षांपासून एकनिष्ठ राहिलं आहोत, असे आवाहन बारामतीकरांना करून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा सध्या बारामतीत आहे.
युगेंद्र पवार आज बारामती दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी बारामती तालुक्यातील उंडवडी ग्रामस्थांशी संवाद साधला खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार होत असल्याची चर्चा होत आहे, या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी वरील वक्तव्य केले आहे.
बारामती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याची तक्रार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत गेली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनीही यावर भाष्य केले आहे. दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळाव्यांमधून माझ्याबाबत अपशब्द वापरले जात आहे. शिवराळ भाषा केली जात आहे. तालुक्यात फिरू न देण्याची धमकी देत आहे.
या आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच युगेंद्र पवार यांनी केलेले वरील वक्तव्य विचार करायला लावणारे आहे .आगामी काळात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. या वातावरणात कार्यकर्त्यांसह नेत्यांना धमकीचे प्रकार होत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागल्याची सध्या चर्चा रंगू लागली आहे.