• Mon. Nov 25th, 2024
    Hatkanangle Constituency: …तो निर्णय महाविकास आघाडीने घ्यावा; माजी खासदाराची रोखठोक भूमिका

    कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून मतदार संघात दौरा करत आहे. तसेच २०१९पासून मी सर्वांच्या संपर्कात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र एकला चलो रेच्या घेतलेल्या भूमिकेचे माझ्या मतदारसंघातील मतदारांनी स्वागत केल आहे. मी कोणत्याही आघाडी सोबत जाणार नाही आधी स्पष्ट केले आहे. यामुळे माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीने ठरवाव आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करणारा नेता म्हणून माझ्या विरोधात उमेदवार उभा करत नसतील तर त्याच मी स्वागतच करतो अशी रोखठोक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

    …तर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाही म्हणणार नाही

    लोकसभा निवडणुकीत पूर्वानुभव लक्षात घेता महायुती आणि महाविकास आघाडीचा यांना लांब ठेवत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. यामुळे कोणत्याही आघाडीशी मी संपर्कात नाही. राज्यातील हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, परभणी , माढा या लोकसभा मतदारसंघात आमची तयारी चालू आहे. मात्र निवडणुकीसाठी लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असल्याने तेथील उमेदवारांवरच आम्ही निर्णय सोडला आहे. जर कार्यकर्त्याची संपूर्ण तयारी असेल आणि त्याला निवडणूक लढवायची असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याला निवडणूक लढू नको असे म्हणणार नसल्याचे ही राजू यांनी स्पष्ट केले आहे.

    गेल्या २३ वर्षांपासून मी निवडणुकीच्या राजकारणात आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून हा जिल्हा मला ओळखतो, माझी चळवळ सर्वजण पाहत आहेत. यामुळे यंदाच्या लोकसभेची निवडणूक मी मतदारांवर सोडली आहे. यामुळे माझं काय करायच त्यांनीच ठरवायचं आहे. विरोधकांनी आठ हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा केला आहे. मात्र नारळ फोडून झाले मात्र त्यापैकी किती कामं झाली हे जनता बघून घेईल. मी आता कुणावरही टीका करणार नाही. कारण मतदारांनी पाच वर्षात किती काम झाल हे पाहिले आहे. यामुळे मतदार संघातील मतदार योग्य तो निर्णय घेऊन उमेदवार निवडून देतील असा मला ठाम विश्वास आहे, असे ते यावेळी म्हणाले आहेत.

    विशिष्ट पक्षाच्या नेत्यांच्या साखर कारखान्याला थकहमी कशी?

    भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्यांच्या जवळ असलेल्या साखर कारखानदारांच्या ६६० कोटी रुपये कर्जाची हमी राज्य सरकारने घेतली आहे. मात्र भाजपने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारखानदारावर पैशांची खैरात केली असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच अजित पवार यांनी सत्तेत नसताना हमी देण्यास विरोध केला होता त्यावेळी मी त्याच समर्थन केले होतं. मात्र आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी आमची भूमिका बदलली आहे. विशिष्ट पक्षाच्या नेत्यांच्या कारखान्याला हमी दिली जाते त्यामध्ये देखील पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला हमी दिली जात नाही. मग लोकसभा निवडणुका ठेवून जनतेच्या पैशांची उधळण केली जात आहे का? असा सवाल उपस्थित होत असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.

    मोदी का परिवार पेक्षा आम आदमी का परिवार म्हणावं

    लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने मोदी का परिवार ही टॅगलाइन सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, या देशाचे राजकारण कधीच व्यक्ती केंद्रित चालल नाही. इंदिरा गांधी यांच्या काळात देखील काही जणांनी हा प्रयोग झाला होता मात्र तो फार काही टिकला नाही. हा देश लोकशाही मानणारा आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे हा देश कोणत्याही एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालणारा नाही. हा देश आम आदमीचा आहे कोणाच्या बापाचा नाही. त्यामुळे भाजपने मोदी का परिवार पेक्षा आम आदमी का परिवार म्हणावे, असे शेट्टी म्हणले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed