• Sat. Sep 21st, 2024

‘घाटी’चे स्वयंपाकगृह केव्हा सुधारणार? प्रश्न प्रलंबित, अभ्यागत समिती सदस्यांकडून पाठपुरावा

‘घाटी’चे स्वयंपाकगृह केव्हा सुधारणार? प्रश्न प्रलंबित, अभ्यागत समिती सदस्यांकडून पाठपुरावा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वर्षानुवर्षे दररोज दोन्ही वेळा पाचशेपेक्षा जास्त रुग्णांचे जेवण तसेच चहा-नाष्टा तयार होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्वयंपाकगृहामध्ये (किचन) विविध सोयीसुविधांची प्रतीक्षा असून, हे किचन कात टाकणार आहे की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे अभ्यागत समिती सदस्यांकडूनही या प्रश्नी मागच्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर प्रत्यक्ष हालचाली नसल्याचेही समोर येत आहे.

घाटी रुग्णालयाचे स्वयंपाकगृह पहिल्यापासून सर्जिकल बिल्डिंगमध्ये आहे आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे जेवण याच ठिकाणी तयार होते. एवढेच कशाला शासकीय कर्करुग्णायातील रुग्णांचेही जेवण याच स्वयंपाकगृहामध्ये तयार होते आणि याच स्वयंपाकगृहामधून त्यांना पुरवठा होतो. सणासुदीचे मिष्टान्न भोजनही याच किचनमध्ये तयार होते. महत्त्वाचे म्हणजे रुग्णांच्या प्रकृतीनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे भोजन तयार केले जाते. साहजिकच रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी साह्यभूत ठरणारे हे भोजन असावे, अशी अपेक्षा घाटीतील स्वयंपाकगृहाकडून आहे. त्यासाठीच स्वयंपाकगृहाचे आधुनिकीकरणही तितकेच गरजेचे आहे, याकडे अनेकदा लक्ष वेधले गेले आहे. आतापर्यंत या ठिकाणी गरजेनुसार सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच सहा महिन्यांपूर्वी अभ्यागत समिती सदस्यांकडून या प्रश्नी लक्ष वेधण्यात आले होते व आताही अधिष्ठातांना या विषयावर पत्र देण्यात आले आहे.

पत्रात मागण्यांची उजळणी

घाटीच्या स्वयंपाकगृहप्रश्नी अभ्यागत समिती सदस्यांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. यानुसार, स्वयंपाकगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी उपलब्ध करण्यात यावी, स्वयंपाकासाठी नेहमीच फिल्टरचे पाणी वापरण्यात यावे, किचन ओटा आणि सर्व टाइल्स बदलण्यात याव्यात, धूर बाहेर निघण्यासाठी चिमणी बदलण्यात यावी, अग्निसुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात यावी व आवश्यक त्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात याव्यात. मुदतबाह्य फायर एक्स्टिंग्विशर तातडीने बदलण्यात यावेत, प्रत्यक्ष रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या थाळ्या, ‘सप्लाइंग चेअर’सारखे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावे, स्वयंपाकगृहासाठी स्वतंत्र इन्व्हर्टर किंवा जनरेटरची सोय करावी आदी मागण्यांची उजळणी अभ्यागत समिती सदस्यांनी नुकत्याच अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिलेल्या पत्रात केली आहे. स्वयंपाकगृहासाठी पाठीमागून आपत्कालीन दरवाजा सज्ज करण्यात यावा, असेही सदस्यांचे म्हणणे आहे. हे पत्र डॉ. सुक्रे यांना नुकतेच देण्यात आले असून, या पत्रावर सदस्य मोहसीन अहमद यांची सही आहे.
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलात १,४६५ पदांची भरती, पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांची माहिती, जाणून घ्या
अभ्यागत समिती सदस्यांनी स्वयंपाकगृहाच्या सुधारणांबाबत पत्र दिले आहे. याविषयी नक्कीच विचार केला जाईल आणि कशा पद्धतीने या सुधारणा करता येतील, याचा सर्वांगीण आढावा लवकरच घेतला जाईल.- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed