• Sat. Sep 21st, 2024

पुणे, पिंपरीच्या शाळा हुशार; ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ अभियानात पालिकेची ही शाळा ठरली अव्वल

पुणे, पिंपरीच्या शाळा हुशार; ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ अभियानात पालिकेची ही शाळा ठरली अव्वल

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना’त ‘अ’, ‘ब’ वर्ग महापालिकांच्या सरकारी शाळांच्या गटात पुणे महापालिकेच्या डॉ. यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन (क्रमांक १९) शाळेने पहिला क्रमांक पटकाविला आहे. दुसरा क्रमांक पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाने मिळवला. खासगी शाळांमध्ये ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने (निगडी) पहिला आणि न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागने तिसरा क्रमांक पटकाविला.

शाळांनी यश संपादन केल्यामुळे त्यांना शैक्षणिक आणि पायाभूत विकासासाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. पहिला क्रमांक प्राप्त केलेली डॉ. यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन शाळा कात्रजमध्ये असून, पटसंख्या ७०४ आहे. सरकारी शाळा गटात तिसरा क्रमांक नाशिक येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ४९ने मिळवला. खासगी शाळांच्या गटात दुसरा क्रमांक नागपूरमधील सरस्वती विद्यालय प्राथमिक शाळेने पटकाविला आहे. पुणे महापालिकेच्या शाळांचा विकास होण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी विशेष लक्ष दिले आहे.

राज्यस्तरीय पुरस्काराबरोबरच विभागनिहाय पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुणे विभागातून सरकारी शाळा गटामध्ये पहिला क्रमांक जिल्हा परिषदेच्या पाबे येथील प्राथमिक शाळेने, दुसरा क्रमांक नगर जिल्हा परिषदेच्या संवत्सर प्राथमिक शाळेने आणि तिसरा क्रमांक चिंचणीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने (जि. सोलापूर) पटकावला आहे. खासग शाळा गटामध्ये प्रवरा कन्या विद्यामंदिर आणि लोणी काळभोरच्या ज्युनिअर कॉलेजने संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक सोलापूर जिल्ह्यातील निंबर्गी येथील श्री बसवेश्वर शाळेने आणि तिसरा क्रमांक गुरुवर्य आर. पी. सबनीस विद्यामंदिर, नारायणगाव (पुणे) या शाळेने पटकावला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.
कार आणि बाईकसाठी व्हीआयपी नंबर हवाय ? वाचा ही बातमी, आणि ‘या’ सोप्या 7 स्टेप्स करा फॉलो
आमच्या शाळेत क्रीडा सुविधांसोबतच शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. शैक्षणिक उपक्रमही यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी पालकांची पसंती शाळेला आहे. महापालिकेने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी आतापर्यंत नऊ बस दिल्या आहेत.- सुजाता कदम, मुख्याध्यापिका, डॉ. यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन शाळा.

शाळेत थ्रीडी प्रींटिंग, रोबोटिक्सची लॅब असून, दोन परकीय भाषाही शिकवल्या जातात. शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येतात. शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांचाही विकास झाला आहे. यामुळे शाळेला यश मिळाले आहे. – मनीषा मिनोचा, मुख्याध्यापिका, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed