विभाग स्थलांतरामुळे पोलिसी कार्यवाहीतही बाधा निर्माण होऊन विलंब होत असून, आरोग्यसेवा व कागदपत्रांच्या पूर्ततेतील हे ‘अंतर’ कमी करण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘कॅज्युलिटी’ व आपत्कालीन विभाग महिनाभरापासून नवीन ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे. सुसज्ज इमारत असली, तरी तेथील अडचणी अधिक आहेत. एकाच कक्षात वैद्यकीय उपचार, जखमींवर उपचार, वैद्यकीय तपासणी, पोलिसांची तपासणी, मृत्यूनंतरची कागदपत्रे तयार करण्याचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे रुग्णदेखील त्रासले असून, पोलिसांनाही सतत चौकीपासून दूर गेलेल्या कक्षापर्यंत फेऱ्या माराव्या लागत आहेत. गंभीर बाब म्हणजे रुग्णाला उपचारार्थ दाखल केल्यावर वैद्यकीय तक्रार नोंदविण्यासाठी (एमएलसी) नातलगांना चौकीत यावे लागते. साधारण चार-पाच वेळेस अशी पायपीट संबंधितांना करावी लागत आहे. अगोदर सिव्हिलच्या मुख्य इमारतीत ‘कॅज्युलिटी’ असल्याने चौकी जवळ होती. त्यामुळे नातलगांचा या प्रक्रियेत खोळंबा होत नव्हता. सध्या ‘कॅज्युलिटी’ शोधण्यापासून अडथळे येत असून, पुढील कागदपत्रांच्या पूर्ततेमध्ये अधिक त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
काय आहेत अडचणी?
-सिव्हिलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलिस चौकी
-सिव्हिलच्या पाठीमागील भागात ‘कॅज्युलिटी’
-सिव्हिलच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात शवविच्छेदन कक्ष
-‘एमएलसी’साठी सिव्हिलचा फेरा; ‘कॅज्युलिटी’जवळ असावी चौकी
-‘कॅज्युलिटी’मध्ये औषधोपचार, सायंकाळी ‘ओपीडी’, तिथेच मृत्यूचीही नोंद
-अनेकदा ‘कॅज्युलिटी’तील बेडवर रुग्ण, तर समोरील ‘स्ट्रेचर’वर मृतदेह
-वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांसाठी स्वतंत्र कक्षच नाही
-एकाच कक्षात सर्व प्रक्रिया; कपड्याच्या ‘पार्टिशन’चा वापर
एकत्रच रुग्ण तपासणीने ‘ताप’
सायंकाळी पाच वाजेनंतर शहर व ग्रामीण पोलिस दलातील पथके जिल्हा रुग्णालयात विविध गुन्ह्यांतील संशयितांची आरोग्य तपासणी करण्यासाठी येतात. पोलिस व न्यायालयीन कोठडीत संशयितांना नेण्यापूर्वी ही तपासणी महत्त्वाची असते. त्यावेळी पोलिसांची वाहने सिंहस्थ इमारतीसमोर उभी असतात. परिणामी रुग्णवाहिकांसाठी पुरेशी जागाच नसते. त्यामुळे रुग्णांना त्वरित ‘कॅज्युलिटी’पर्यंत नेण्यात अडथळे येतात. यासह ‘कॅज्युलिटी’मध्ये एकीकडे सामान्य रुग्णांची तपासणी सुरू असते, तेव्हा त्यांच्यासमोरच संशयितांचीही तपासणी होते. काही महिला संशयितांचाही समावेश असतो. त्यामुळे रुग्णांसह नातलगांना त्रास होतो. यापूर्वी हे कक्ष स्वतंत्र असल्याने नातलगांचा तिथे फारसा संबंध येत नव्हता, अशी तक्रारही नागरिक करीत आहेत.