• Sat. Sep 21st, 2024

संतापजनक! पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवून मुलींचे शोषण, मांत्रिकासह टोळीला अटक

संतापजनक! पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवून मुलींचे शोषण, मांत्रिकासह टोळीला अटक

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मांत्रिक बाबासह सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीत महिलेचाही समावेश असून महाराष्ट्राच्या विविध भागातील गोरगरीब मुलींना या टोळीने स्वतःच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. ठाण्याच्या राबोडी येथील एका अल्पवयीन मुलीचे या टोळक्याने शोषण केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून भविष्यात या प्रकरणातील चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.ठाण्याच्या राबोडी पोलिस ठाण्यात १५ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट एककडून सुरू होता. युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलिस निरीक्षक विकास सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या पथकाने कसून तपास करत १७ फेब्रुवारीला राबोडीतील असलम खान (५४), सलीम शेख (४५) या दोघांना या प्रकरणात अटक केली. तर २७ फेब्रुवारीला मुंबईच्या अँटॉप हिल झोपडपट्टीतील मांत्रिक साहेबलाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा (६१) याला अटक केली. या त्रिकुटाच्या चौकशीतून राबोडीतील तौसिफ शेख (३०), शबाना शेख (४५), शब्बीर शेख (५३) तसेच लालबाग, मुंबईतील हितेंद्र शेट्टे या चौघांना अटक करण्यात आली. ही टोळी गोरगरीब पीडित मुलींना हेरून पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवत असे. तसेच विश्वास बसावा यासाठी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केलेला महिलेचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ मुलींना दाखवला जात होता. यामध्ये महिलेशेजारी पैशांचा ढीग पडलेला दिसत असे. तुम्हाला अशा पद्धतीने कोट्यावधी रुपये हवे असतील तर, विधी करण्यास सांगून मांत्रिक व त्याचे साथीदार पीडित मुलीवर अत्याचार करीत होते. राबोडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने घरातून गायब झालेल्या एका तरुणीचा पोलिसांनी शोध घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

माझ्या बहिणीचा नाद सोड नाहीतर…, आधी भावाची तरुणाला ताकीद, नंतर घडलं धक्कादायक कृत्य

कोडवर्डचा वापर

पीडित मुलींना या विधीच्या नावाखाली बंद खोलीत आणल्यानंतर टोळीतील सदस्य आपापसात कोडवर्डमध्ये संवाद साधत होते. मांत्रिकाला डॉक्टर, मुलींना रस्सी असे संबोधले जात होते. या टोळीने आतापर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागातील तब्बल १७ मुलींशी असे गैरवर्तन केल्याची प्राथमिक माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे.

बीड पोलिस अॅक्शन मोडवर, जरांगेंच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर हटवले

पोलिसांचे आवाहन

अशा टोळीच्या बळी पडलेल्या मुलींनी घाबरून न जाता पोलिसांकडे धाव घेत या प्रकरणाची माहिती देण्याची आवश्यकता असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पालकांना आपल्या मुलींच्या वर्तवणुकीत कोणताही बदल झालेला आढळल्यास त्यांना विश्वासात घेत चर्चा करण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed