• Sat. Sep 21st, 2024

‘मावळ’साठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी; भाजपशी लढत, उद्धव ठाकरेंनी कंबर कसली

‘मावळ’साठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी; भाजपशी लढत, उद्धव ठाकरेंनी कंबर कसली

म. टा. वृत्तसेवा, पनवेल: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा दौरा आखण्यात आला आहे. सोमवार, ४ मार्च रोजी उद्धव ठाकरे हे एकाच दिवशी जनसंवाद मेळावे घेणार आहेत.

रायगड आणि पुणे जिल्ह्यांतील सहा विधानसभा मतदारसंघ एकत्र करून नव्याने मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून येथे शिवसेनेचा भगवा फडकला आहे. राष्ट्रवादीची ताकद असतानाही शिवसेनेच्या खासदाराचा विजय झाला. परंतु शिवसेनेत पडलेल्या दोन गटानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मावळवर पुन्हा शिवसेनेचा झेंडा रोवण्याचे आव्हान ठाकरे गटाच्या शिवसेनेपुढे उभे आहे. मावळ मतदारसंघातील कर्जत येथे नुकताच भाजपचा मेळावा पार पडला. मावळमध्ये भाजपचा खासदार निवडून गेला पाहिजे, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रभारी प्रमोद सावंत यांनी मात्र आपल्याला देशात ४००पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी येईल त्या उमेदवाराचे काम करायचे असल्याचे सांगून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

दुसरीकडे, हा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे यांचे सोमवार, ४ मार्च रोजी जनसंवाद मेळावे होत आहेत. दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे पनवेलमध्ये ठाणा नाका येथे असतील. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता सतीश झाकोटिया मैदान, खोपोली आणि सायंकाळी सात वाजता नवीन शेवा मैदान उरण येथे जनसंवाद मेळावे होणार आहेत. तळोजा येथे शिवसेना नेते बबन पाटील यांच्या बाळासाहेब पाटील विधी महाविद्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे ठाकरे यांची पनवेलमध्ये दोन कार्यक्रमांना उपस्थिती असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडात जनसंवाद मेळावे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पनवेलमध्ये येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक असलेले संजोग वाघेरे पाटील यांनी पनवेलसह उरण, खोपोलीत बॅनरबाजी करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed