जरांगे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही कारण नसताना एसआयटी चौकशी सुरू केली आहे. फडणवीस यांची राज्यात गुंडगिरी दहशत सुरू आहे. आमच्या गावातील माणसे चौकशीसाठी ते घेऊन जात आहेत. गृहमंत्री फडणवीस यांचा गैरसमज आहे. आम्ही दोन दिवस वाट पाहणार आहोत, अन्यथा तालुक्यातील सर्वच लोक पोलिस ठाण्यात जाऊन बसून जाब विचारू. फडणवीस यांची ही दहशत राज्यासाठी चांगली नाही. लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांची मजा बघणार आहोत. काहीही झाले तरी आम्ही सगेसोयरे यावर ठाम आहोत. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. दहा टक्के आरक्षण टिकण्यासाठी दिलेले नाही. माझी नार्को टेस्ट करा, मी तयार आहोत आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचे वाटोळे केले.’
बीडमध्येही बैठक
बीड: लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उतरविण्याचा ठराव मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. बीड शहरातील मुक्ता लॉन्स परिसरामध्ये बीड तालुकास्तरावरील मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तालुकाभरातून मराठा समाज उपस्थित होती. यामध्ये काही ठराव मान्य करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक गावातून दोन उमेदवार देणार, राज्य सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण मान्य नाही, सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करा, असे ठराव या बैठकीत मान्य करण्यात आले.