• Mon. Nov 25th, 2024
    हीना गावित यांचे काकाही लोकसभेला इच्छुक, शिंदे गटाचाही विरोध, विद्यमान खासदारांना डच्चू?

    जगदिश सोनवणे, नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नुकतेच भाजपचे पक्ष निरीक्षक येऊन गेलेत. यावेळी विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांच्यासह पाच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यात हीना गावित यांचे काका राजेंद्रकुमार गावित यांचादेखील समावेश होता. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले असून काका-पुतणीमध्येच लढत रंगणार का? अशीही चर्चा रंगू लागली आहे.

    त्यातच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून हीना गावित यांच्या नावाला विरोध करण्यात येत आहे, तर दुसऱ्या बाजूला हीना गावित यांनी गेल्या काही वर्षात केलेली विकासकामे, दांडगा जनसंपर्क, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले जेवणाचे आमंत्रण, यामुळे हीना गावितांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चादेखील रंगू लागली आहे.

    आता भाजपचा बालेकिल्ला

    नंदुरबार लोकसभा मतदारसंघ देशातील पहिल्या क्रमांकाचा आहे. सन २०१४ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ आता भाजपचा हक्काचा मतदारसंघ असल्याचे बोलले जाते. सलग ९ वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या माणिकराव गावितांचा पराभव करत २०१४ मध्ये डॉ. हीना गावित या एक लाखाहून अधिक मताधिक्क्याने निवडून आल्या होत्या, तर २०१९ मध्ये देखील कॉग्रेसचे ॲड. के. सी. पाडवी यांचा पराभव करत हीना गावित सुमारे ९५ हजारांच्या लीडने विजयी झाल्या होत्या. खरे तर २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये हीना गावितांचे मताधिक्क्य २ टक्क्यांनी घटले असले तरी आजही त्या भाजपाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

    असे असले तरी दुसऱ्या बाजूला महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. हीना गावितांच्या नावाला प्रखर विरोध दर्शविला जात आहे. गेल्या महिन्यात नंदुरबार डेव्हलपमेंट फोरमच्या मंचावरदेखील जिल्ह्यातील सर्व नेते विरुद्ध गावित परिवार काहीसा असाच संघर्ष असल्याचे पाहावयास मिळाले होते. यामुळे डॉ. हीना गावितांना उमेदवारी मिळू नये, यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
    चव्हाण राज्यसभेवर, चिखलीकर निर्धास्त; पण माजी खासदारांच्या सूनबाईंचा भाजपप्रवेश, नांदेडमध्ये गणितं फिरली?

    गावित काका-पुतणीची मुलाखत

    दरम्यान, नुकतेच भाजपाचे माजी मंत्री बाळासाहेब भेगडे आणि माजी मंत्री अशोक उईके यांनी नंदुरबार विश्रामगृहात जिल्ह्यातील पदाधिकारी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यासमवेत दाराआड चर्चा करुन त्यांची मते जाणून घेतली. शेकडो भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी लोकसभा उमेदवारीबाबत मते जाणून घेण्यात आली. यानंतर भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांच्यासमवेत त्यांचे काका भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कृष्णराव गावित, आ. राजेश पाडवी, भाजपाचे उमेदवार राहिलेले सुहास नटावदकर यांच्या कन्या समिधा नटावदकर, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते कुवरसिंग वळवी यांचे इच्छुक असलेले सुपुत्र डॉ. विशाल कुवरसिंग वळवी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात हीना गावितांच्या नावाला शिंदे गटाकडून विरोध होत असला तरी मतदारसंघात करण्यात आलेली विकासकामे, जनसंपर्क, पक्ष संघटन आणि पक्ष श्रेष्ठींकडे असलेले वजन यामुळे हीना गावितांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
    अजितदादा गटात नाराजी, लोणावळ्यात १३७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र, आमदार सुनील शेळकेंना धक्का

    काँग्रेसमधून कोण?

    दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या गोटात अद्याप शांतता असली तरी येत्या १० मार्च रोजी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात येणार असल्याने त्यानिमित्त नवापूरात आयोजित करण्यात आलेल्या सभेतच काँग्रेस उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी मंत्री वसंत पुरके गेल्या तीन महिन्यांपूर्वी नंदुरबार दौऱ्यावर आले होते तर त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेदेखील नंदुरबार दौऱ्यावर येऊन गेले असून त्यावेळी काँग्रेसच्या इच्छुकांची नावे जाहीर करण्यात आली होती. यात माजी मंत्री आ. ॲड. के .सी. पाडवी, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, आ. शिरिष नाईक, माजी जि. प. अध्यक्षा रजनी नाईक व सीमा वळवी-नाईक यांच्या नावांची चर्चा होती.

    ५ वर्षांनी दिसलेल्या खासदार डॉ. हिना गावित यांना ठाकरे गटाने दाखवले काळे झेंडे!

    Read Latest National News Updates And Marathi News

    असे असले तरी नाईक परिवारातूनच काँग्रेसचा उमेदवार येण्याची शक्यता वर्तविली जात असून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून माजी जि. प. अध्यक्षा रजनी नाईक यांच्या नावाचीदेखील लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे. यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आजची राजकीय समीकरणे पाहता उमेदवारांची नावे निश्चित झाली नसली तरी भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच बडी लढत होणार, एवढे मात्र नक्की!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *