लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे, असं ट्विट नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे एकंदरच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा गाजणार असल्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, राणे यांनी केलेल्या ट्विटचे आता वेगवेगळे अर्थ लावले जात असून ज्याची उमेदवारी फायनल होईल त्याला भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी देणार का? अशीही चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे आता लवकरच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये कोणत्या नवीन समीकरण पाहायला मिळणार याची चर्चा आहे.
चार दिवसांपूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले उमेदवार किरण सामंत यांनी ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे ऐनवेळी किरण सामंत भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविणार का? अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत.
देशासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवार असणार का? अशी चर्चा आहे. कारण राज्यसभेत राणेंना डावलल्यानंतर त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.