• Mon. Nov 25th, 2024
    गुन्ह्याचा अहवाल सादर करण्यासाठी लाचेची मागणी, ASIला ४० हजार घेताना रंगेहात पकडलं

    धुळे : विमा प्रतिनिधीने फसवणूक केल्यामुळे दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी ५० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४० हजारांची लाच स्विकारतांना आज रंगेहाथ ताब्यात घेतले.तक्रारदार यांचे चुलत भाऊ यांचा २२ ऑगस्ट २०२१ रोजी अपघाती मृत्यू झाला. त्यांनी त्यांच्या हयातीत एच.डी.एफ.सी कारगो या इन्शुरन्स कंपनीकडून दोन कोटी रूपयांचा विमा काढला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर विमा प्रतिनिधीने सदर पॉलिसीची रक्कम वारसांच्या नावे जमा न करता परस्पर दुसऱ्याच्या नावे जमा करून फसवणूक केली. याबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद यांच्याकडे होता.
    बारामतीत येताय तर घरी जेवायला या, शरद पवारांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण
    दरम्यान, तक्रारदार यांची वहिणी यांनी तपासकामी न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावरून न्यायालयात सकारात्मक अहवाल देण्याकरता सहा. पोउनि आरिफ अली सैय्यद यांनी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदार यांनी धुळे एसीबीकडे धाव घेतली. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. आरिफ अली सैय्यद याचेशी तडजोड करून ४० हजार रूपये देण्याचे तक्रादाराने ठरवले व लाचेची रक्कम घेण्यासाठी गिंदोडिया चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या भाग्यश्री पान कॉर्नर समोर बोलवले. आरिफ अली सैय्यद यांना लाचेची ४० हजारांची रक्कम घेताना धुळे एसीबी पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. दरम्यान, कारवाई करताना एसीबीच्या एका कर्मचाऱ्याला झालेल्या झटापटीत पायाला किरकोळ जखम देखील झाली आहे. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद यांनी यापूर्वी देखील लाच घेतली होती. २२ जुलै २०१० रोजी ७० हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने २०१३ मध्ये पाच वर्ष शिक्षा दिल्याने पोलीस खात्यातून त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सन २०१९ मध्ये सैय्यद यांना दिलासा दिल्याने ते पुन्हा पोलीस खात्यात पुन्हा रुजू झाले होते.

    सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोनि. मंजितसिंग चव्हाण, पथकातील पोनि. हेमंत बेंडाळे, पोनि. रूपाली खांडवी, राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर या पथकाने केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed