• Sat. Sep 21st, 2024

पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीचे जागा वाटप ठरले; राष्ट्रवादीला एक तर शिवसेना, भाजपला प्रत्येकी दोन जागा

पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीचे जागा वाटप ठरले; राष्ट्रवादीला एक तर शिवसेना, भाजपला प्रत्येकी दोन जागा

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील केवळ सांगली आणि सोलापूर या दोनच मतदार संघात पक्षाचे निरीक्षक नियुक्त केले आहेत, यामुळे कोल्हापूर, हातकणंगले शिवसेनेकडे तर सातारा राष्ट्रवादीकडेच राहण्याचे संकेत आहेत. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील एका जागेवर दावा करताना दुसरीकडे निरीक्षकची नियुक्ती टाळत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला न दुखावण्याचे धोरण स्वीकारल्याने खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांचा मार्ग सुकर झाला आहे.

राज्यात महायुती आणि महाविकास यांच्याकडून जागा वाटप आणि उमेदवार निश्चितीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी मुंबईत बैठकांचा जोर आहे. जेथे ज्या पक्षाचा खासदार ती जागा त्या पक्षाकडे असे महायुतीचे धोरण जवळजवळ निश्चित आहे. पण काही मतदार संघातील विद्ममान खासदारांविषयी नाराजी असल्याने या जागा आपल्याकडे घेण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी उमेदवार बदलण्यात अडचणी आल्या तर आहे त्या उमेदवारास कमळ चिन्हावर लढविण्याच्याही हालचाली सुरू आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील दोनही खासदार शिंदे गटाचे आहेत. मंडलिक आणि माने या दोघांविषयी जनमानसात नाराजी असल्याचा सर्वेक्षणाचा अहवाल असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे यातील एक जागा भाजपतर्फे लढविण्याच्या हालचाली आहेत. यासाठी कोल्हापुरातून धनंजय महाडिक, समरजित घाटगे, शौमिका महाडिक तर हातकणंगलेतून प्रकाश आवाडे, राहूल आवाडे, विनय कोरे, सदाभाऊ खोत यांची नावे चर्चेत आहेत. या चर्चेमुळे मंडलिक व माने अस्वस्थ आहेत. यातूनच मंडलिकांनी थेट केंद्रिय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन उमेदवारीच्या शब्दाची आठवण करून दिली.

या सर्व पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील २३ मतदार संघात पक्षाचे निरीक्षक नियुक्त करताना पश्चिम महाराष्ट्रातील तीन मतदार संघ वगळले आहेत. यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले व सातारा यांचा समावेश आहे. याचा अर्थ जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघ शिंदे गटालाच मिळण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. याशिवाय सातारा मतदार संघ उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला देण्याची शक्यता आहे.
भाजपने सांगली व सोलापूर या दोन मतदार संघात निरीक्षक नियुक्त केले आहेत. त्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार मेधा कुलकर्णी तसेच मुरलीधर मोहोळ व सुधीर गाडगीळ यांचा समावेश आहे. खासदार धनंजय महाडिक यांची मुंबईचे निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed