या सर्व काँग्रेसने पुढाकार घेऊन बैठक घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही जागा आता काँग्रेसलाच सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी अप्रत्यक्षरीत्या उमेदवारी बाबत होकार दिल्याने काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. जागा मिळणार हे निश्चित झाल्यानेच तातडीने आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची काँग्रेस कमिटीत बैठक घेतली.
या बैठकीस शिवसेना, राष्ट्रवादी, जनता दल, शेकाप, माकप, भाकप यासह या अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. लोकसभेची जागा जिंकण्यासाठी काय काय करता येईल, प्रचार कसा करता येईल यासंदर्भात सर्वांची मते जाणून घेण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी पुढाकार घेऊन ही बैठक घेतली. ज्या अर्थी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे याचा सरळ अर्थ ही जागा याच पक्षाला मिळाल्याचे स्पष्ट होते. या पक्षाकडे शाहू महाराजांच्या रूपाने मिळालेले सक्षम उमेदवार, तीन मतदारसंघात असलेली काँग्रेसची ताकद, सतेज पाटील यांची यंत्रणा आणि व्यूहरचना यामुळेच ही जागा काँग्रेसला सोडले असल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीस काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, संजय चौगुले, वैभव उगळे, शिवाजीराव परुळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.