• Sun. Jun 14th, 2026

    Pune Crime: पुण्यात नोकरीसाठी आल्या, पण बुधवार पेठेत अडकल्या; देहविक्रयसाठी ग्राहकांकडे पाठवलं, अखेर चार महिलांची सुटका!

    Pune Crime: पुण्यात नोकरीसाठी आल्या, पण बुधवार पेठेत अडकल्या; देहविक्रयसाठी ग्राहकांकडे पाठवलं, अखेर चार महिलांची सुटका!

    स्नेहल निमगिरे, पुणे: चांगली नोकरी मिळेल, हाताला काम लागेल आणि घरची परिस्थिती सुधारेल या आशेने चार बांगलादेशी महिला पुण्यात आल्या. कुणाला ब्युटी पार्लरमध्ये काम देतो, तर कुणाला शिवणकामाची नोकरी मिळवून देतो अशी आश्वासने या महिलांना देण्यात आली. परदेशात जाऊन काम मिळेल या विश्वासाने त्या महिलांनी होकार दिला. मात्र पुण्यात आल्यानंतर त्यांच्यासमोर वेगळंच वास्तव उभं राहिलं आणि त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या महिलांना आधी बांगलादेशातून भारतात आणण्यात आलं. नोकरी, चांगला पगार आणि राहण्याची सोय असे अनेक आश्वासने त्यांना देण्यात आली होती. पण पुण्यात आल्यानंतर त्यांना बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगमधील एका खोलीत ठेवण्यात आलं. हळूहळू त्यांना लक्षात आलं की त्यांना ज्या कामासाठी आणलं, ते काम वेगळंच आहे. त्यानंतर या महिलांना देहविक्रीसाठी ग्राहकांकडे पाठवलं जात असल्याची माहिती समोर आली. विरोध केला तर धमक्या दिल्या जात होत्या. काही दिवसांतच त्या पूर्णपणे या जाळ्यात अडकल्या. आरोपींनी त्यांचे मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात घेतली होती.

    दरम्यान, झोन-१ चे डीसीपी ऋषिकेश रावळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ५ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा दरम्यान बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भास्मे यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यात चार बांगलादेशी महिला आणि एक पुरुष सापडला. त्यानंतर पोलिसांनी सगळ्यांची चौकशी सुरू केली.

    या प्रकरणी बांगलादेशातील एका एजंटसह बाबू भैय्या उर्फ पापा शेख, भोपसिंग राजपूत आणि जागेची मालकीण मीनाक्षी रमेश मेत्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बारामतीत देहव्यापार प्रकरणीसहा जणांवर गुन्हा

    भिगवण रोडवरील प्रणव लॉजमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर बारामती पोलिसांनी धडक कारवाई करून पाच जणांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान चार परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमनाथ महादेव खोमणे (रा. सावळ, ता. बारामती), धीरज रामभाऊ जाधव (रा. जालना), सागर संजय सोडबुके (रा. बारामती), मेराजुल जानिफ अली (रा. गोलपारा, आसाम), अफजल मझीबर रहमान हुसेन आणि सदाम जुमरुद्दीन हुसेन (दोघेही रा. बरपेटा, आसाम) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हे परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याचे तपासात समोर आले असून, या छाप्यात आसाम व बंगाल येथील चार महिलांची पोलिसांनी सुटका केली.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *