म. टा. वृत्तसेवा, पंचवटी: दिंडोरीरोडवर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. २३) रोजी रात्री घडली. अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीर जखमी झाल्याने प्रकृती चिंताजनक असून त्यांव्यावर उपचार सुरू आहे.डॉ. राठी हॉस्पिटलमध्ये असताना एक अंदाजे ३० ते ३२ वर्ष वयोगटातील संशयित डॉ. राठी यांना भेटण्यासाठी आला, त्यावेळी डॉ. राठी व संशयित आरोपी यांच्यात बोलणे झाले व काही वेळाने पुन्हा दुसऱ्या कॅबिनमध्ये दोघेही चर्चा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी संशयित व डॉ. राठी यांच्यात वाद झाला व संशयिताने कॅबिनची कडी लावून धारदार कोयता काढून राठी यांच्या डोक्यावर मानेवर वार केले.
डॉ. राठी यांच्या कॅबिनमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्याने रुग्णालयाचा स्टाफ केबिनकडे धावत गेले, त्यावेळी राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री राठी यांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
संशयित हल्ल्यानंतर पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून शोध सुरू केला आहे संशयिताने राठी यांच्यावर हल्ला का केला याचे मुख्य कारण समजू शकले नाही. हा हल्ला झाल्याचे समजतात पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली, अधिक तपास सुरू आहे.