आमदार रवींद्र धंगेकर हे पुण्यात बोलत होते. पुणे लोकसभा निवडणुक देवेंद्र फडणवीस लढविणार अशी चर्चा सुरू आहे.तर तुम्ही निवडणुक लढविणार का? या प्रश्नावर कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, मी गेले ३० वर्षांपासून कसबा मतदारसंघात काम पाहत आहे. माझ्या या ३० वर्षाच्या कालावधीत कसबा विधानसभा मतदारसंघात विविध प्रभागातून मी काम केलं आहे. काही वर्षापूर्वी जनतेने मला कसबा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून दिलं, कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे मी त्या ठिकाणी निवडून आलो होतो. हीच परिस्थिती लोकसभा निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे.
काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने कोणताही उमेदवार दिला तरी आम्ही त्याची मदत करणार आहोत आणि जर मला संधी दिली तर मी नक्कीच ही निवडणूक जिंकून दाखवेल, असं धंगेकर म्हणाले.
पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. पण या सर्व चर्चेवर एकच सांगू इच्छितो, आजवर पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी राहिले आहेत आणि लोकसभा निवडणुकीत देखील जनता माझ्या पाठिशी राहतील. त्यामुळे पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवावी किंवा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणुक लढवावी, निवडणूक मीच जिंकणार, असा ठाम विश्वास व्यक्त करत धंगेकर यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.