म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक शहरात आलिशान वाहनांच्या दालनांचे मालक असलेल्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याला सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून साडेसात कोटी रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवत गंडा घातला. अवघ्या काही दिवसांत व्यापाऱ्याचा विश्वास संपादित करून साडेतीन कोटी रुपये संशयितांनी लुटले. विशेष म्हणजे त्यासाठी स्वतंत्र ‘ॲप’चा वापर करून अपहारानंतर हे ‘ॲप’ डीलिट केले. या प्रकरणी व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वाहन विक्रीचे ‘शो-रूम’ असलेल्या एका व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार ‘ब्लॅकरॉक कॅपिटल सिक्युरिटीज मार्केट पुलअप’ या नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि त्यातील तीन मोबाइल क्रमांक, तसेच ‘एंजल वन कस्टमर केअर’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील चार मोबाइल क्रमांक यासह ज्या बँक खात्यांवर पैसे वळते झाले, त्या खातेधारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. दरम्यान, फिर्यादी यांना महिनाभरापूर्वी व्हॉट्सॲपवर मेसेज प्राप्त झाला. त्यांना सायबर चोरट्यांनी एका ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादित करून त्यांना नियमित शेअर ट्रेडिंग करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यासाठी एक लिंक शेअर करून अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. हे ॲप हे खऱ्या शेअर मार्केटिंग ॲपप्रमाणे काम करीत होते. त्यामुळे फिर्यादी यांना त्यामध्ये पैसे गुंतविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी दहा लाख रुपये गुंतविल्यावर त्यावरील नफा ‘ॲप’मध्ये दर्शविण्यात आला. त्यामुळे त्यांनी साडेतीन कोटी रुपये गुंतवले. मात्र, सात दिवस उलटल्यावर हे पैसे काढण्यासाठी ‘ॲप’द्वारे त्यांनी प्रयत्न केले. पैसे काढता येत नसल्याने त्यांनी मुलाशी संपर्क साधला. त्या वेळी ॲप बनावट असून, फसवणूक झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी सायबर पोलिस तपास करीत आहेत.
PM आवास योजनेतून घराचं स्वप्न साकार; प्रशासनानं बुलडोझर फिरवला, कारवाईची चर्चा; कारण काय?संशयितांचे बनावट मेसेज
फिर्यादींना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केल्यावर त्यातील सदस्यांनी ‘आम्हीही या स्वरूपात पैसे गुंतविले. त्याचा आम्हाला फायदा झाला. इतक्या मोठ्या प्रमाणात परतावा मिळाला. ही गुंतवणूक फायदेशीर आहे,’ या स्वरूपात मेसेज केले. त्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास अधिक वाढला. हा प्रकार १२ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान घडला. मात्र, हे मेसेज संशयितांचा ‘ट्रॅप’ होता. त्यामुळे अॅपची लिंक पाठविणारे, मेसेजेस करणारे, पैसे स्वीकारणारे या सर्वांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. संघटितरीत्या सायबर चोरटे या स्वरूपाची फसवणूक करीत अशल्याचे उघड होत आहे.
पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक
सोशल मीडियाद्वारे येणारे मेसेज, लिंक्सवर विश्वास ठेवू नये. अनेकदा फसवे अॅप, लिंक, मेसेजद्वारे गुंतवणुकीचे पर्याय व माहिती दिली जाते. या स्वरूपात फिर्यादी यांचीही साडेतीन कोटींना फसवणूक झाली आहे.
– रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर