गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने मुंबईतील तीन जागा लढवल्या होत्या, तर भाजपने तीन जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. महायुतीने संपूर्ण मुंबई काबीज करत सहाही लोकसभा उमेदवार निवडून आणले होते. म्हणजेच शिवसेनेचे तीनही खासदार निवडून आले होते. त्यापैकी दोन खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आहेत, तर ठाकरेंसोबत केवळ एकच खासदार आहे.
ठाकरे गटाने मुंबईतील आपले एकमेव विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यासह एकूण चार जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच २०१९ मध्ये भाजपसोबत महायुतीत असताना लढल्यापेक्षा एक अधिक जागा ठाकरे गट यंदा लढवणार असल्याची माहिती आहे. भाजपकडे राहिलेली ईशान्य मुंबईची जागाही ठाकरे गट लढणार आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे गटाने चौथ्या जागेवरही दावा सांगण्याची तयारी केली.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. तर उत्तर पश्चिम मुंबईतून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना तिकीट देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटातून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनाच पुन्हा संधी मिळण्याची चर्चा आहे. तसं झाल्यास या मतदारसंघात बापलेकामध्ये लढाई पाहायला मिळू शकते.
याशिवाय, आतापर्यंत किरीट सोमय्या, मनोज कोटक यांनी सांभाळलेल्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातही ठाकरे गट उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचेच माजी खासदार संजय दिना पाटील ही निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ईशान्य मुंबई हा मतदारसंघ युतीत नेहमी भाजपकडे राहिल्याने प्रथमच ठाकरे गटाच्या रुपाने शिवसेना इथे नशीब आजमावताना पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार कोण?
दक्षिण मुंबई मुंबई – विद्यमान खासदार अरविंद सावंत
दक्षिण मध्य मुंबई – राज्यसभा माजी खासदार अनिल देसाई
उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर
ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील