म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या मेळाव्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २८ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या मेळाव्यासाठी ४० एकरात जय्यत तयारी केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्यासाठी ३० विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. २००४ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना यवतमाळला आले होते. त्यांची जाहीर सभा पोस्टल ग्राउंडवर झाली होती. यानंतर २० मार्च २०१४ रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णीजवळ असलेल्या दाभडी येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आले होते. ‘चाय पे चर्चा’तून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी १६ फेब्रुवारी २०१९ रोजी पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. या दौऱ्यानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही केंद्रीय मंत्री दौऱ्याच्या आदल्या दिवशीच; २७ फेब्रुवारीला येण्याचा अंदाज आहे.