महेश तिवारी, गडचिरोली : दंडकारण्यात २००हून अधिक जवानांच्या हत्येसाठी जबाबदार माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य हिडमा याच्या छत्तीसगडमधील पूर्वती गावावर सुरक्षा दलांनी ताबा मिळविला आहे. घनदाट जंगलाने वेढलेल्या सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा भागातील या गावातून माओवादी कारवायांचे नियोजन होत होते. माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात जवान धडकल्याने हा चळवळीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.माडवी हिडमा उर्फ इदमूल पोडीयम भीमा हे त्याचे पूर्ण नाव. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेला हिडमा गुरिल्ला पद्धतीने सुरक्षा दलाशी मुकाबला करण्यात तरबेज आहे. त्याला माओवाद्यांच्या पीपल्स गुरिल्ला आर्मीच्या कंपनी क्रमांक एकचा कमांडर बनविण्यात आले. या बटालियन अंतर्गत माओवाद्यांचे तीन युनिट काम करतात. सुकमा आणि बिजापूर हे या युनिटचे कार्यक्षेत्र असून अत्याधुनिक शस्रांचा वापर करतात. दंडकारण्यातील माओवाद्यांची मुख्य संघटना मानल्या जाणाऱ्या दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचाही हा सदस्य आहे. हिडमाच्या नावाची भीती संपूर्ण दंडकारण्यात आहे. २०१०मध्ये चिंतलनारमधील ताडमेटलाच्या जंगलात सीआरपीएफच्या ७६ जवानांना घेरून ठार मारण्यात आले होते. या घटनेचा मास्टरमाइंड हिडमा होता. २०१३मध्ये जिरम घाटीत काँग्रेस नेत्याच्या रॅलीवर हल्ला, बुरकापाल, टेकलगुडम अशा प्रत्येक हल्ल्यावेळी हिडमाचे नाव चर्चेत आले. आज पाच राज्यांत तीन कोटी रुपयांहून अधिकचे बक्षीस जाहीर आहे. हिडमाचे निश्चित स्थळ शोधण्याचा प्रयत्न अनेकदा सुरक्षा यंत्रणांनी केला. पण, यश आले नाही.
रन आऊट झालेल्यांना बॉलिंग का करायची ;डॉ. अमोल कोल्हे यांचे आढळरावांना सनसनीत उत्तरहजारावर जवान धडकले
सुकमा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर पूर्वती हे गाव आहे. या गावाचा परिसर कोअर एरिया म्हणून ओळखला जातो. या गावातून शंभराहून अधिक युवक माओवादी चळवळीत सहभागी आहेत. घनदाट जंगलानी वेढलेल्या या गावाला जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. माओवाद्यांच्या अनेक हिंसक कारवायांचे केंद्रबिंदू हे गाव आहे. या गावात हिडमाचे घर असल्यामुळे मूळचे कोल्हापूरकर असलेले सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी थेट हिडमाच्या गावातच पोलिस ठाणे उभारण्याचा निर्णय घेतला. छत्तीसगड पोलिस दल, सीआरपीएफ, कोब्रा बटालियनच्या हजारावर जवानांना घेऊन गावात प्रवेश केला. हजारावर जवान पाहून गावकरी जंगलात पसार झाले. यात अनेक जनमिलिशिया सदस्य होते. चव्हाण यांनी हिडमाच्या आई आणि बहिणीची भेट घेऊन लोकशाहीवर विश्वास ठेवा, असे आवाहन केले.
पूर्वतीमध्ये नेमके काय?
– माओवादी संघटनेकडून चार एकरात सेंद्रीय शेती केली जात होती.
– हिरव्या पालेभाज्या या शेतीत पिकविल्या जात होत्या.
– मासे पालनासाठी एक मोठा तलावही बांधला होता.
– माओवाद्यांचे विश्रामगृह आणि प्रशिक्षण केंद्रही आढळले.
दहा चकमकी…
– टेकलगुडमपासून पूर्वतीपर्यंत येत असताना माओवाद्यांनी जवानांना अडविण्याचा प्रयत्न केला.
– जवान आणि माओवाद्यांत दहा चकमकी झाल्या.
– माओवाद्यांनी आयडी स्फोटही घडविला.