मुंबईतील हवेची गुणवत्ता गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खालावत चालली होती. त्यामुळे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मुंबई पालिकेने ऑक्टोबर २०२३ मध्ये एक परिपत्रक प्रसारित करून मुंबईतील बांधकाम स्थळांवर प्रदूषण नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. तर मुंबईतील रस्त्यांवरही पाणी फवारणी करण्यास पालिकेने सुरुवात केली. मुंबईत एकूण २ हजार ५० किमीचे मुख्य रस्ते आहेत. सर्व २४ वॉर्डांमध्ये ६० फुटांपेक्षा जास्त रुंद आणि वर्दळीच्या पदपथांची स्वच्छता आणि धुलाई करण्यास पालिकेने सुरुवात केली. त्यात एकूण ३५७ रस्त्यांचा समावेश आहे.
रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेले पाणी तसेच तलाव, विहिरी, कूपनलिका यांसारख्या स्थानिक जलस्रोतांमधून उपलब्ध पाण्याचा वापर केला जात आहे. सुरुवातीला ४०० ते ४५० किमी रस्त्यांची पाण्याने धुलाई करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हेच प्रमाण ५५० किमीपर्यंत पोहोचले. आता दररोज ६७१ किमीचे रस्ते पाण्याने धुतले जात आहेत. यासाठी २१७ पाण्याच्या टँकरचा वापर होत असून १५ लाख २९ हजार ५८३ लाख लिटर पाणी वापरले जात आहे. तर १७ मिस्टिंग मशिनही वापरल्या जात आहेत. पालिकेच्या घाटकोपर, कुलाबा, मालाड येथील प्रकल्पांमधून सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आर दक्षिण या कांदिवली पश्चिममध्ये ४२ किमी, एम पूर्व या गोवंडीत ३९ किमी, दादर, प्रभादेवी या भागात ४८ किमी आणि एल वॉर्ड या कुर्ला भागात ४० किमीचे रस्ते पाण्याने धुण्यात येत आहेत.
पाणीकपातीची टांगती तलवार
मुंबई पालिकेकडून सध्या रस्ते धुण्यासाठी पाण्याचे नियोजन होत आहे. मात्र मुंबईकरांवर दहा टक्के पाणीकपातीची टांगती तलवार असतानाही त्याचे नियोजन पालिकेकडून होताना दिसत नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्केपेक्षाही पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाण्याची गरज भागवण्यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातील अतिरिक्त पाणीसाठ्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. यासाठी राज्य सरकारकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबईतील रस्ते धुण्यासाठी मात्र पुनर्प्रक्रिया केलेले पाणी, कूपनलिका आदी स्रोतांचा वापर होत असून पिण्याच्या पाण्याचा वापर मात्र होत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.