यंदा थंडी फारशी जाणवलीच नाही. तरीसुद्धा जानेवारीअखेरीस थोडाफार गारठा होता. या काळात ८.७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. हा या मोसमातील नीचांक होता. मात्र, त्यानंतर परत एकदा तापमान सामान्य झाले व आता त्यात वाढही होऊ लागली आहे. मध्यंतरी पावसाळी तसेच ढगाळ निर्माण वातावरण झाल्यानेसुद्धा तापमानात वाढ झाली आहे. आता २५ व २६ फेब्रुवारी रोजी परत एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अकोला व बुलढाणा वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, मंगळवारी शहरात ३५.२ आणि १८.८ अंश इतक्या कमाल व किमान तापमानाची नोंद करण्यात आली. सध्या कमाल तापमान हे सरासरीपेक्षा दीड तर किमान तापमान हे सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे. तरीसुद्धा प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, २२ ते २८ फेब्रुवारी या काळात तापमानात थोडीफार घसरण होण्याची शक्यता आहे. या काळात तापमान १ ते ३ अंशांनी कमी असू शकते. फेब्रुवारीतील किमान तापमान हे १६ अंश आहे. सध्या पारा १९वर स्थिरावला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तापमान १५ ते १२ अंशांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे तापमानात ४ ते ७ अंशांची घसरण अपेक्षित आहे.