पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय कारवाई करणार? त्यांना जागेवर राहायचं आहे का? ते माझा व्हिडीओ शूट करून फार तर फार त्यांच्या बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असं वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी अकोल्यात बोलताना केलं. त्यांच्या याच विधानावर विरोधी पक्षातून टीकेची झोड उठली आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांना सुनावलं आहे.
जेवत्या ताटावरून पोलिसांनी बापाला उचललं होतं, लक्षात आहे ना?
ज्या पोलिसांबद्दल नितेश राणे यांनी अपशब्द वापरले, तेच पोलीस आपल्या संरक्षणासाठी असतात. प्रामाणिकपणे ते आपली सेवा बजावतात. रितेश राणे म्हणाले पोलीस काय करतील, माझा व्हिडिओ काढतील आणि बायकोला दाखवतील. नितेश राणे विसरले की काय, त्यांच्या बापाला पोलिसांनी जेवता जेवता उचलून आणलं होतं? एक दिवस असा येईल पोलीस यांच्या बायको देखत टपोरे मारून यांना उचलतील, अशा शब्दात देशमुख यांनी नितेश राणे यांच्यावर तोंडसुख घेतलं.
सत्तेची मस्ती जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही
नितेश राणे यांचं अकोल्यातील भाषण म्हणजे सत्तेची मस्ती आहे. ही सत्तेची मस्ती जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. राजकारण करताना लोकांच्या सेवेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना वादात ओढणं ठीक नसल्याचं मतंही त्यांनी बोलून दाखवलं.
नितेश राणे यांची वादग्रस्त विधानांची माळ
हिंदू समाजावर होणारे आक्रमण रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी आवाज उचलला पाहिजे. राजरोसपणे हिंदू समाजाच्या कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घरातून बळजबरीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाही. पोलिसांना भाषणाचा व्हिडीओ काढू द्या. ते काहीही करू शकत नाहीत. फार तर फार तो व्हिडीओ बायकोला दाखवतील. आमच्या राज्यात आमच्यावर काय कारवाई करतील, त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही, अशी वादग्रस्ते विधाने नितेश राणे यांनी केली.