• Sat. Sep 21st, 2024
पवार काका पुतण्यात ‘बारामती’वरून संघर्ष, राज ठाकरे यांच्या पठ्ठ्याचीही एन्ट्री

पुणे (बारामती) : मनसेने राज्यात १३ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. याचदरम्यान, पवार काका पुतण्यात ‘बारामती’वरून संघर्ष सुरु असून, राज ठाकरे यांच्या पठ्ठ्याचीही एन्ट्री झाली असल्याचं बोललं जात आहे. ते म्हणजे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर. ते म्हणाले की, बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्याचे ठरले तर मनसे पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढेल. बारामतीत सध्या दोघांची भांडणे सुरु आहेत. त्यात तिसऱ्याचा लाभ होण्याचे प्रत्यंतर येईल, असं मत अॅड. सुधीर पाटसकर यांनी व्यक्त केले.लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने त्यांची भूमिका जाणून घेतली असता ते म्हणाले की, ”मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उमेदवार दिला तर विजय मिळविणे हेच आमचे लक्ष्य असेल. त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मुख्य संघटक नेमला असून बुथ संघटनेपर्यंत आम्ही बांधणी केली आहे. बारामतीत पवार यांच्यात दोन गट पडले असले तरी मनसेने स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवलं आहे. पक्ष प्रमुख राज ठाकरे हे निवडणूकीपूर्वी भूमिका जाहीर करतील, ते सांगतील त्याप्रमाणे काम केले जाईल” असं पाटसकर यावेळी म्हणाले.
अजितदादांकडे उमेदवारी मागितली, भावना गवळींविरोधात दंड थोपटणाऱ्या मोहिनी नाईक कोण आहेत?
”लोकसभेला माझ्या उमेदवाराला निवडून द्या अन्यथा मी विधानसभा लढवणार नाही”. अजित पवार यांच्या या वक्तव्याबद्दल ते म्हणाले की, ”ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. परंतु मी मतदार म्हणून विचार केला तर असे दिसून येते की, पवारसाहेब यांचा पुतण्या म्हणून त्यांच्या जागी मी असतो, तर मी सुद्धा तेवढाच विकास केला असता. त्यामुळे अजित पवार विकासाचे जे सांगत आहेत त्यात फारसे त्यांनी वेगळे केले आहे असं नाही. ज्याला संधी मिळते तो काम करतच असतो. आयत्या पिठावर त्यांनी रेघोट्या मारल्या आहेत. पवारसाहेब यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. राज ठाकरे यांनीही शून्यातून सुरुवात करत पुढे विश्व निर्माण केले. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी हे केले असते का, असा सवाल त्यांनी केला. मनसे महायुतीत सहभागी होणार का? राज ठाकरे हेच पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed