• Sat. Sep 21st, 2024
Atal Setu : अटल सेतूला मुंबईकरांची पसंती, एकाच ठिकाणी ‘पथकर’ पद्धत ठरतेय सोयीस्कर

मुंबई: अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू सुरू होऊन महिना पूर्ण झाला आहे. यादरम्यान ८ लाखांहून अधिक वाहनांनी या सेतूवरून प्रवास केला आहे. सेतूवरील विविध सुविधा आता नावारूपास येत असून यावर पथकर एकाच ठिकाणी असल्याची रचना आहे. ती वाहनचालकांसाठी सोयीस्कर ठरत आहे.

सेतूची सुरुवात-अखेर

या सेतूला शिवडी न्हावाशेवा संबोधले जात असले तरिही तो शिवडी ते चिर्ले असा आहे. चिर्लेच्या आधी उलवे-शिवाजीनगर व जासई, असे दोन आंतर-बदल या सेतूवर आहेत.

मुंबई बाजूने प्रवेश

मुंबई बाजूने या सेतूवर प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत. दक्षिण मुंबईतून पूर्व मुक्त मार्गावरून येऊन उजवे वळण घेऊन सेतूवर प्रवेश करता येतो. तर उत्तर दिशेने पूर्व मुक्त मार्गाच्या खालून शिवडी रेल्वे स्थानकाच्या थोडे दक्षिणेकडे गेल्यावर डाव्या बाजूने वर येता येते. त्याचवेळी चिर्लेकडून मुंबईत येताना डावीकडे शिवडीला उतरता येते किंवा थोडे सरळ जाऊन पुन्हा डावीकडे जाऊन थेट पूर्व द्रुतगती मार्ग पकडून दक्षिण मुंबईत जाता येते. तर. सरळ जाऊन उजवीकडे उतरून उत्तर दिशेला जाता येते.

पथकर नाका

या सेतूवर पूर्ण प्रवासासाठी (शिवडी ते चिर्ले) चारचाकीसाठी पथकर २५० रुपये आहे. मात्र हा पथकर शिवडी म्हणजेच मुंबईच्या बाजूने चढताना आकारला जात नाही. मुंबईच्या बाजूने प्रवेश केल्यावर चिर्लेकडे उतरताना ‘एक्झिट’ पथकर भरावा लागतो. त्याचवेळी चिर्लेकडून मुंबईच्या दिशेने येताना ‘एन्ट्री’ पथकर आहे. त्यावेळी मुंबईच्या दिशेने बाहेर पडताना पथकर आकारला जात नाही. हा पथकर नाका सेतूचा समुद्री भाग संपताच किनारपट्टीवरील गव्हाण येथे आहे. तेथून चिर्ले जेमतेम दोन किमीवर आहे.
अटल सेतूवर पहिल्या महिन्यात किती टोलवसुली? आकडेवारी कमी की जास्त? काय सांगतो अहवाल
आंतर-बदलांची स्थिती

शिवडी किंवा मुंबईहून चिर्लेच्या दिशेने जाताना पहिला आंतर-बदल उलवे शिवाजीनगरचा आहे. त्यासाठीचा उतार रस्ता तयार आहे. मात्र याच आंतर-बदलाखाली किनारा रस्ता होऊन त्याला हा आंतर-बदल जोडला जाणे अपेक्षित आहे. ती जोड अद्याप नवी मुंबई सागरी किनारा रस्ता तयार नसल्याने अपूर्ण आहे. दुसरा आंतर-बदल जासई येथे आहे. याठिकाणीदेखील उतार रस्ता बांधून पूर्ण आहे. मात्र हा आंतर-बदल राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार असल्याने तो जोड रस्ता जमिनीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अपूर्ण आहे. प्रत्येक आंतर बदलावर पथकर असल्याने जेवढा सेतू वापरात येईल, त्यानुसारच पथकर द्यावा लागणार आहे. उदा. उलवे शिवाजीनगर ते चिर्ले प्रवास केल्यास ५० रुपये व उलवे शिवाजीनगर ते शिवडी प्रवास केल्यास २०० रुपयेच किमान पथकर आकारला जाईल.
(संकलन-चिन्मय काळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed