कोल्हापूरकरांना ४२५ कोटी रुपयांच्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून मिळणार कायमस्वरुपी शुध्द व मुबलक पाणी
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका) : कोल्हापूर महापालिकेसाठी मंजूर केलेल्या ६३४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. पंचगंगेच्या प्रदुषणमुक्तीसाठी नदीत जाणाऱ्या उर्वरीत सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४० कोटी रूपयांची मंजूरी देणार असल्याचे सांगत सर्व सांडपाणी शुद्ध होवून पंचगंगा १०० टक्के प्रदुषणमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकार्पण झालेल्या विकासकामांमध्ये कोल्हापूर शहरासाठीच्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन प्रकल्पासह शहरातील १०० कोटींचे रस्ते व अन्य विकास कामांचा समावेश आहे. याचबरोबर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उपलब्ध केलेल्या निधीतून खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पणही यावेळी झाले.
या कार्यक्रमास पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, रवीकांत अडसूळ, माजी नगरसेवक राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील देवस्थाने ही आपली बलस्थाने आहेत. पंढरपूरसह कोल्हापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी अंबाबाई व जोतिबा देवस्थानचा आराखडा तिरूपती बालाजी मंदिराच्या धार्तीवर केला जातोय. प्रत्येकजण करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेवूनच कामाला सुरूवात करतो. अशा या कोल्हापूरचा विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. नुकतेच पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 3200 कोटी रूपये जागतिक बँकेकडून मंजूर केले आहेत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महापूरावेळी नगर विकास व आरोग्य मंत्री असताना येथे काम करताना मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केली, येथील लोक चांगले आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या विविध प्रश्नांचा व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम नियुक्तीचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. येत्या काळात कोल्हापुरातून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर येथील दळणवळण यंत्रणा सुधारेल. कोल्हापूर हे आता मुंबई पुण्याच्या जवळ येत आहे. ते स्वच्छ, हरित व सुंदर शहर करायचे आहे. देशात पायाभूत सुविधा सर्वात जास्त महाराष्ट्रात उभारल्या जात आहेत.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, पंचगंगेच्या प्रदुषणमुक्तीसाठी मंजूर झालेल्या निधीमुळे शहराच्या खालील गावांना आता अशुद्ध पाण्याचा त्रास होणार नाही. तसेच कोल्हापूर हे आध्यात्मिक पर्यटन केंद्र करण्यासाठी विविध देवस्थानांचा विकास करण्यासाठी नुकताच 900 कोटी रूपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यास शासनाकडून येत्या अर्थसंकल्पात समावेश करावा,अशी मागणी केली.
मंत्री श्री. केसरकर यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या पुर्णत्वाचा आनंद व्यक्त करून रंकाळा येथील कारंजा प्रकल्प पूर्ण झाल्यास कोल्हापूरच्या वैभवात भर पडेल, असे सांगितले. पंचगंगा प्रदुषण मुक्तीसाठी मंजूर कामे पूर्ण झाल्यावर येत्या दोन वर्षात पंचगंगा प्रदुषणमुक्त होई, असा विश्वास व्यक्त केला.
श्री. क्षीसागर यांनी शहरातील विविध विकास कामांबाबत माहिती देवून महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी कायम नियुक्ती, कोल्हापूर हद्दवाड लवकर पुर्ण करण्याची मागणी केली.
लोकार्पण केलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना केंद्र सरकारच्या लघू आणि मध्यम शहरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजना (UIDSSMT) व अमृत योजनेतून कोल्हापूर शहरास कायम स्वरुपी शुध्द व मुबलक पाण्याचा पुरवठा करणेच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे. कोल्हापूर शहराची सन २०४५ सालाची प्रतिदिन २३८ दशलक्ष लिटर्स शुद्ध पाण्याची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने योजनेचे डिझाईन करण्यात आले आहे. योजनेची किंमत ४२५.४१ कोटी रुपये असून केंद्र ६० टक्के, राज्य २० टक्के व मनपा हिस्सा २० टक्के आहे. योजनेमध्ये काळम्मावाडी धरणातून ५३ किमीची १८०० मीमी व्यासाची पाईपलाईन टाकून पुईखडी येथे ग्रॅव्हीटीव्दारे पाणी आणून ८० दशलक्ष लिटर क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र बांधले आहे. या योजनेत अत्याधुनिक स्काडा सिस्टीमद्वारे सर्व यंत्रणा नियंत्रित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत योजना पूर्ण झाली असून या योजनेद्वारे शहराला पाणी पुरवठा होत आहे. तसेच १०० कोटींच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) रस्ते प्रकल्पाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले.
याचबरोबर स्वच्छ भारत अंतर्गत उपलब्ध झालेल्या वाहनांचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुढील विकासकामे, उपक्रमांचे ई- लोकार्पण, उद्घाटन झाले. यामध्ये लोक सहभागातून (CSR) विकसित घरफाळा संगणकीय प्रणाली लोकार्पण, रंकाळा तलाव जतन व संवर्धन उद्घाटन, रंकाळा येथे बॉटनिकल गार्डन (शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेष्ठ नागरी विरंगुळा केंद्र) उद्घाटन, श्री महालक्ष्मी मंदीराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनीयुक्त विद्युत खांब बसविणे उद्घाटन, पंचगंगा घाट येथील विकासकामे व संवर्धन, पंचगंगा स्मशानभूमी विकसित करणे उद्घाटन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती व स्फुर्ती सदन बांधणे उद्घाटन, केशवराव भोसले नाट्यगृह व शाहू खासबाग मैदान जतन व संवर्धन करणे दुसरा टप्पा उद्घाटन, राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्थळ विकसीत करणे उद्घाटन, महालक्ष्मी मंदिराशेजारील सांडपाणी निर्गती करीता भुयारी गटरचे काम करणे उद्घाटन व महात्मा गांधी मैदान येथील पर्जन्य जल वाहिनीचे काम आदींचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध लाभ व मदतीचे वितरण
या कार्यक्रमात शहीद जवान संभाजी भिमसेन बागडी यांच्या मातोश्रींना पाच एकर शेतजमीन वाटप केलेल्या जमीनीचा सातबारा व ८ अ प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने अनुकंपा तत्वावर २६ जणांना शासन सेवत समावून घेतले आहे. यातील प्रशांत देसाई व गिरीश अजगर यांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले.
०००