• Sat. Sep 21st, 2024

देशात महत्त्वाच्या ठिकाणी हल्ल्याचा प्लान ‘एनआयए’ने उधळला, आयसिससाठी काम करणाऱ्याला अटक

देशात महत्त्वाच्या ठिकाणी हल्ल्याचा प्लान ‘एनआयए’ने उधळला, आयसिससाठी काम करणाऱ्याला अटक

छत्रपती संभाजीनगर: आयसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक सीरिया) या दहशवादी संघटनेच्या संपर्कात येऊन, देशभरात महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या एका युवकाला छत्रपती संभाजीनगर शहरातील बेरीबाग भागातून ‘एनआयए’च्या ‘टीम’ने ताब्यात घेतले. दहशतवादी कृत्य घडविण्याबाबतचे कागदपत्रे; तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू या युवकाच्या ताब्यातून जप्त करण्यात आले. या संदर्भात ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव महंमद झोएब खान वाहेद खान (वय ३५, रा. बेरीबाग, हिमायत बाग) असे आहे.

नऊ ठिकाणी छापे

राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे (नॅशनल इनव्हेटिगेशन एजन्सी-एनआयए) प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, दहशतवादी कृत्यात काही जण सहभागी होत असल्याची माहिती ‘एनआयए’च्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून शहरात नऊ ठिकाणी ‘एनआयए’च्या पथकाने गुरुवारी (१५ फेब्रुवारी) छापे मारले. यातील काही ठिकाणी तपास यंत्रणेचा तपास अद्यापही सुरू आहे. या कारवाईत बेरीबाग येथील महंमद झोएब खान याच्या घरी ‘एनआयए’च्या टीमने छापा घातला. या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरातून अनेक आक्षेपार्ह इलेक्ट्रॉनिक गॅझेट; तसेच गुन्हेगारीशी संबंधित असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणात महंमद झोएब याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात ‘एनआयए’च्या मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशतवादाचे नवीन मॉड्यूल

ताब्यात घेतलेल्या महंमद झोएब खान याच्या अटकेनंतर दहशतवादी कारवाईतील नवीन मॉड्यूल समोर आले आहे. याअंतर्गत महंमद झोएब याने ‘आयसिस’साठी काम करण्यासाठी एका परदेशी व्यक्तीकडून बैथ (शपथ) घेतली होती. प्रतिज्ञा घेऊन दहशतवादी कृत्यांसाठी काम करण्याचे नवीन मॉड्यूल समोर यानिमित्ताने आले आहे, अशीही माहिती ‘एनआयए’ने दिली; तसेच महंमद झोएब हा भारतातील; तसेच जगातील दहशतवादी कारवाया आणि सीरियाला हिंसक जिहादशी जोडण्यासाठी विदेशी हँडलरच्या मदतीने काम करीत होता, असे ही ‘एनआयए’ने स्पष्ट केले.

…असा होता कट

महंमद झोएब देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याच्या कटात सामील होता. ‘आयसिस’मध्ये सामील होण्यासाठी आणि त्याच्या हिंसक विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी शारीरिक आणि सोशल मीडियावर, कट्टरपंथी बनवण्यात आणि त्यांची भरती करण्यातही महंमद झोएब सामील होता, असेही समोर येत आहे.

अन्य संशयितांचा शोध

‘आयसिस’च्या कारवाईशी संबंध असलेल्या एकूण नऊ ठिकाणी ‘एनआयए’ने छापा घातला. महंमद झोएब याच्या संपर्कात विविध शहरांमधील काही संशयित असल्याबाबतची प्राथमिक माहिती समोर आली. आगामी काही दिवसांत या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed