महादेव साळुंखे म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी अनेक नेत्यांनी आत्मबलिदान दिले आहे. राज्यामध्ये सध्या सहा कोटी मराठा समाज आहे. मराठ्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. आज मराठा समाजाची परिस्थिती ही बारा बलुतेदारांसारखी झाली आहे. मराठा समाज दारिद्र्यरेषेखाली गेला आहे. मराठा समाजाची आर्थिक सामाजिक परिस्थिती ही हलाखीची झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आंदोलनाची तीव्रता वाढलेली आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चुकीची माणसे खोडा घालत आहेत.
जरांगे-पाटील आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. जो माणूस मराठ्यांचे हित पाहून आंदोलन करत आहे. त्याच्याकडे सरकारचे लक्ष नाही. सरकार मधीलच काही लोक जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलत आहेत. नारायण राणे हे मराठा समाजाचे नेते नसून केवळ मनोज जरांगे पाटील हेच मराठा समाजाचे नेते आहेत. मंत्री छगन भुजबळ हे भ्रष्टाचारासाठी २६ महिने जेलमध्ये होते. केलेली चोरी उघड होऊ नये म्हणून त्यांची सध्या वळवळ सुरू आहे. त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सर्वांना माहित आहे. छगन भुजबळ यांनी मराठा समाजाची ताकद पाहून विरोध करावा, असं ते म्हणाले आहेत.
महादेव साळुंखे पुढे म्हणाले की, येत्या २० तारखेला कायदा मंजूर होऊन आम्हाला आरक्षण मिळेल, अशी आशा आहे. सध्या मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते आम्ही होऊ देणार नाही. जरांगे पाटील यांच्या जीवास काही बरे वाईट झाल्यास राज्यात भाजप औषधालाही शिल्लक ठेवणार नाही. जो आमच्या आडवे येईल त्याला मातीत आम्ही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष अधिक पाटील, शहर उपाध्यक्ष सुनील दळवी, संपर्कप्रमुख अण्णा कुरळपकर, महापालिका क्षेत्राध्यक्ष सुनील चव्हाण, संतोष पाटील, गोपाळ पाटील, बी आर पाटील आदी उपस्थित होते.