गेल्या २५हून अधिक वर्षे केवळ राजकीय घोषणांमध्ये असलेले चिखलोली स्थानक अखेर टप्प्याटप्प्याने प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंबनरनाथ, बदलापूर शहरांच्या वेशीवर असलेल्या आणि अंबरनाथ पालिका हद्दीतील वेगाने विस्तारत आणि विकसित होत असलेल्या चिखलोलि भागात हे स्थानक तयार होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर रेल्वे स्थानकासाठी भूसंपादन प्रक्रिया गेल्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात आली. त्यानंतर कल्याण ते बदलापूर या तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेसोबतच स्थानकाच्या कामालाही गती मिळत होती. त्यानुसार रेल्वे स्थानकाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून गेल्या वर्षी थांबा मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे स्थानकउभारणीच्या एक-एक तांत्रिक अडचणीवर मात करत स्थानक उभारणीचा मार्ग मोकळा होत होता. तसेच या स्थानकाच्या उभारणीसाठी रेल्वे प्रशासनाकडून एकूण ७३ कोटी ९२ लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी स्थानक उभारणीच्या कामासाठी रेल्वे प्रशासन एमआरव्हीसीएलकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. अखेर निविदा प्रक्रीयेत जोधपूर येथील विश्नु प्रकाश पुलिंगा लिमिटेड या कंपनीला स्थानक उभारणीच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली आहे. त्याबाबतचे अधिकृत पत्र आणि कामाचे आदेश रेल्वे प्रशासनाकडून १३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसात स्थानक उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार असून, अंदाजे वर्षभरात रेल्वेस्थानक बांधून तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
एमआरव्हीसीएलच्या माध्यमातून जोधपूर येथील विश्नु प्रकाश पुलिंगा लिमिटेड या कंपनीची निविदा या कामासाठी मंजूर झाली आहे.
गेली २५ वर्षे केवळ चर्चेत असलेले चिखलोली स्थानक प्रत्यक्षात उतरत आहे. अंबरनाथ, बदलापूर तसेच वेगाने विकसित होत असलेल्या चिखलोली येथील लाखो रेल्वेप्रवाशांना या स्थानकाचा लाभ होणार आहे. या स्थानकामुळे चिखलोली भागातील गृह प्रकल्प तसेच इतर उद्योगांना चालना मिळत त्यातून हजारो रोजगारही निर्माण होण्यास मदत होणार आहे.- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा
स्थानकामुळे चिखलोलीतील मालमत्तांचे भाव वाढणार
अंबरनाथ, बदलापूरच्या वेशीवर राहणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत
अंबरनाथ, बदलापूर स्थानकावरील रेल्वे प्रवाशांचा भार कमी होणार
गर्दीच्या वेळी अंबरनाथ, बदलापूर स्टेशन परिसरातील कोंडी कमी होण्यासही मदत