• Mon. Nov 25th, 2024

    अनोळखी व्यक्तीवरील विश्वास व्यवसायिकाला पडला महागात, कॉलसेंटरच्या मोहापायी तब्बल ४५ लाख गमावले

    अनोळखी व्यक्तीवरील विश्वास व्यवसायिकाला पडला महागात, कॉलसेंटरच्या मोहापायी तब्बल ४५ लाख गमावले

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: कुरियर आणि आधारकार्ड नोंदणीचा व्यवसाय सोडून अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कॉल सेंटर सुरू करण्याचा मोह दहिसरमधील एका व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला. नितीन बोरकर नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार व्यवसायिकाने कॉल सेंटरसाठी साहित्य खरेदी केले, कामासाठी कर्मचारी नेमले, आगाऊ रक्कम म्हणून या व्यक्तीला लाखो रुपये दिले. या सर्वासाठी जवळपास ४५ लाख खर्च झाले मात्र व्यावसायिकाच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे या व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दहिसर येथील कुरियरचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडे नितीन हा कुरियरच्या निमित्ताने येत होता. कुरियरच्या व्यवसायापेक्षा कॉल सेंटर सुरू केल्यास दरमहा सोळाशे अमेरिकी डॉलर उत्पन्न मिळेल असे त्याने सांगितले. यासाठी सर्व परवानग्या आणि विदेशातील कंपनीसोबत करार करून देण्याची जबाबदारी नितीनने घेतली. फायद्याचा व्यवसाय असल्याने व्यावसायिकाने यासाठी तयारी दर्शवली. कॉल सेंटरसाठी संगणक तसेच इतर साहित्य खरेदी केले. कामासाठी तरुण मुले पगारावर ठेवली. परवानगी आणि आगाऊ रक्कम म्हणून नितीनला लाखो रुपये दिले.

    दोन महिन्यांनंतरही मोबदला नाही

    कॉल सेंटर सुरू करून दोन महिने झाले तरी उत्पन्न, मोबदला काहीच मिळत नसल्याने व्यवसायिकाने नितीन याच्याकडे विचारणा केली. त्याने एक धनादेश दिला आणि खात्यामध्ये काहीच रक्कम शिल्लक नसल्याने तो वटला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यावसायिकाने याबाबत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी नितीनविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *