• Sat. Sep 21st, 2024

गुटखा-सुपारीवर जम्बो कारवाई, सोयाबीनमागे दडवलेला २१ लाखांचा गुटखा हस्तगत, दोन संशयितांना अटक

गुटखा-सुपारीवर जम्बो कारवाई, सोयाबीनमागे दडवलेला २१ लाखांचा गुटखा हस्तगत, दोन संशयितांना अटक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सोयाबीनच्या गोण्यांमागे गुटखा, स्वादिष्ट सुपारी व गुंगीकारक पदार्थांची वाहतूक करणारा एक कंटेनर नाशिक ग्रामीण पोलिसांनी टाके-घोटी या भागात अडवला. २१ लाखांचा अवैध गुटखा व कंटेनर असा ४६ लाखांचा माल जप्त करून दोन संशयितांना अटक केली आहे.

काय प्रकरण?

नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृत भगवान सिंह (वय ४२, रा. राजगड, मध्यप्रदेश) व पूनमचंदर होबा चौहान (५१, रा. मध्यप्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. हे दोघे डीडी ०१, एफ ९१०२ क्रमांकाच्या कंटनेरमधून गुटखा व तंबाखू वाहतूक करीत असल्याची माहिती मालेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी तेगबीर संधू यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांना सापळा रचण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, अंमलदार मनोज सानप यांनी कंटनेर अडवून तपासणी केली. त्यावेळी कंटेनरमध्ये सोयाबीनच्या गोण्यांमागे मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखू असल्याचे उघड झाले. त्यानुसार संशयितांना अटक करून इगतपुरी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एक लाखाचा गुटखा जप्त

मालेगाव : शहरातील गोल्डननगर व फार्मसी कॉलेजजवळ दोन ठिकाणी पवारवाडी पोलिसांनी छापा टाकून एक लाख १९ हजार ५२२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. गोल्डननगर येथील मुमताज चौकात संशयित शेख मिराज शेख वजीर हा राज्यात गुटखा बंदी असताना स्वतःच्या घरात गुटखा बाळगून होता. त्याच्याकडून एक लाख ११ हजार ८०३ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. शेख मिराज याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध पवारवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत फार्मसी कॉलेजजवळील चहाच्या हॉटेलमधून सात हजार ७१९ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी विनोद चव्हाण यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी संशयित अब्दुल रज्जाक एहसान अली यास अटक करण्यात आली. पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed