• Mon. Nov 25th, 2024
    सॉरी दादा, ताई दुसरा पर्याय नाही; भिंतींवर लिहून आयुष्य संपवलं, कारण ऐकून धक्का बसेल

    धुळे : आई-वडिलांनी परिस्थिती अभावी एमपीएसएसी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास नकार दिला. त्यामुळे नैराश्‍यातून १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यात घडली. केतन मोरे असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे सुट्रेपाडा गावासह धुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

    आत्महत्या केलेल्या विद्यार्थी केतन मोरे याने वसतिगृहातील बाथरूममध्येच गळफास घेत जीवनयात्रा संपवली. तत्पूर्वी, त्याने भिंतीवर ”सॉरी दादा, ताई माझ्याकडे दुसरा पर्याय नाही” असे लिहिले होते. पोलिसांनी सांगितले की सुट्रेपाडा (ता. धुळे) येथील केतन मोरे हा अकलाड मोराणे प्र.ल. येथील छत्रपती शिवाजी सैनिकी शाळेत शिकत होता. त्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याची इच्छा होती.

    त्याने ही अपेक्षा तो सुटीत घरी आला असता वडिलांपुढे बोलून दाखवली. मात्र, वडील शेती काम करत असल्याने त्यांनी स्पर्धा परीक्षेचा खर्च आपल्याला झेपवणार नाही, असे सांगत त्याला स्पर्धा परीक्षेच्या तयारीस नकार दिला. त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट केतनने मनाला लावून घेतली. त्याने शाळेत गेल्यानंतर वसतिगृहातील आपल्या रुममधील भिंतीवरही ‘एमपीएससी, यूपीएससी’ असे लिहिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

    आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे केतनला वाटले असावे. याच नैराश्यातून त्याने सकाळी सैनिक शाळेतील वसतिगृहाच्या बाथरूमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्याने भिंतीवर ”सॉरी, दादा, ताई” असे लिहिले होते. त्याने आत्महत्या केल्याचे समजताच वसतिगृहातही खळबळ उडाली. याबाबत शाळेतील शिक्षक प्रमोद साळुंके यांनी केतनच्या पालकांना फोनद्वारे माहिती दिल्यानंतर ते शाळेत दाखल झाले. त्यांनी केतनचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. धुळे तालुका पोलिसांनी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात केतन यास दाखल केले असताना डॉ. झबरलाल मवालिया यांनी मृत घोषित केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *