महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजीसह एकूण आठ माध्यमांच्या ९४३ प्राथमिक शाळांमध्ये दोन लाख ४४ हजार १५२, तर २४८ माध्यमिक शाळांमध्ये एकूण ४३ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबवले जातात. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार उद्योगधंद्यात सहजतेने रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्याचे महत्त्वही समजावे यासाठी पालिका शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र, तसेच क्रीडा संकुल, किचन गार्डन आदी उपक्रम याअंतर्गत राबवले जात आहेत.
आता त्यापुढे पाऊल टाकत, शारीरिकदृष्ट्याही विद्यार्थी तंदुरुस्त राहावेत, यासाठी पालिका उपाययोजना करत आहे. यासाठी पालिकेच्या २०० शाळांमध्ये खुल्या व्यायामशाळा उभारण्यात येणार आहेत. त्याबाबतची घोषणा २०२४-२५च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याला राज्य सरकारच्या जिल्हा नियोजन समितीनेही मंजुरी दिली असून त्यासाठी आर्थिक मदतही केली जाणार आहे.
अहवालानंतर निविदा
सध्या मुंबईतील विविध उद्यानांमध्ये ओपन जिम म्हणजेच खुल्या व्यायामशाळा आहेत. त्याच धर्तीवर शाळांच्या आवारात खुल्या व्यायामशाळा उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिकेचे (प्राथमिक) शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. सध्या प्राथमिक स्तरावर हा प्रस्ताव असून त्यासाठी सल्लागार नेमून प्रकल्प राबवण्याबाबत अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर निविदा काढली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
अशा असतील खुल्या व्यायामशाळा
– या प्रकल्पाला जिल्हा नियोजन समितीकडून आर्थिक पाठबळ
– येत्या आर्थिक वर्षात २०० शाळांमध्ये होणार उभारणी
– व्यायामशाळेत पाच ते सहा प्रकारची व्यायामाची साधने